दिल्लीतील जंतर-मंतर या ठिकाणी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभरात पाहण्यास मिळाले. मुंबईतही अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली. सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तसेच तिच्याविषयी नको नको ते बोलले जात आहे. आता रियाने राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सहभागी होत रियाने सगळं सांगितलं आहे.
रिया अहिरने काय सांगितलं?
मी मुंबईत मुंबई पोलिसांची गाडी अडवली होती. अनेक जण म्हणतात की ही ती मुलगी आहे जिने मुंबई पोलिसांना अडवलं होतं आणि मी व्हायरल झाले आहे असंही म्हणतात. पण मी माध्यमांना आज हे सांगू इच्छिते की मी ती मुलगी आहे जिने २० मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यापासून रोखलं होतं. त्यामुळे तुमचं नरेटिव्ह कृपा करुन बदला. मी जी कृती केली त्यानंतर मला प्रचंड त्रास दिला जातो आहे, छळ केला जातो आहे. मी याला ट्रोलिंग म्हणणार नाही. कारण हा गुन्हा आहे. जनताच नाही, पक्षाचे कार्यकर्तेही माझ्याबाबत वाईटसाईट आणि मनाला येईल ते बोलत आहेत. मी १४० रुपयांमध्ये देहविक्री करते असे घाणेरडे आरोप माझ्यावर केले जात आहेत. तुम्ही विचार करा त्यांचे विचार किती घाणेरडे विचार आहेत आणि आणखी असतील. मी २७ जुलैला गुन्हा नोंदवला होता. आज ५ ऑगस्ट आहे मला अजूनही FIR नाही आलेली. हे मुलींना शिकूही देत नाहीत आणि वाचवतही नाहीत. मी ज्या मुलांसाठी उभी राहिले होते आता ते माझ्यासाठी उभे आहेत. आपण एकमेकांसाठी उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं असं रियाने सांगितलं.

राहुल गांधी काय म्हणाले?
सीजेपीच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांकडून कोणतीही हिंसा झाली नसल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गांधी म्हणाले की, “मी आंदोलन करणाऱ्या तरुणांशी चर्चा केली. शिक्षण व्यवस्था, संविधान आणि भारताच्या भविष्यासाठी लढा देणाऱ्या हजारो तरुणांचे मी आभार मानतो. आमची चर्चा प्रामुख्याने हिंसाचाराच्या मुद्द्यावर झाली. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांनी कोणताही हिंसाचार केला नाही. पण तरीही विद्यार्थ्यांना सतत छळाचा सामना करावा लागत आहे. त्यांना धमकावण्यात आलं, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, मारहाणही झाली”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
तुम्ही कुणाची माफी मागण्याचा प्रश्न नाही-राहुल गांधी
“जेव्हा अन्याय होतो, तेव्हा त्या व्यक्तीचं रक्षण करणं ही नागरिक म्हणून आपली जबाबदारी असते. त्यामुळे तुम्ही (विद्यार्थ्यांनी) काहीही चुकीचं केलेलं नाही आणि तुमची माफी स्वीकारण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कोणाचीही माफी मागण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. खरं तर या सर्व आंदोलकांचा मला अभिमान वाटतो, कारण त्यांनी भारताच्या भविष्यासाठी लढा दिला”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
