माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा बहुचर्चित रिएलिटी शो ‘राईज अँड फॉल सीझन २’ सुरु होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शोच्या पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये तुफान राडा पाहायला मिळाला. भाजपचे माजी प्रवक्ते शहजाद पूनावाला आणि अभिनेता सिवेत तोमर यांच्यात झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. या वादादरम्यान सिवेतने शहजादचे कपडे फाडले त्यानंतर शहजाद जमिनीवर कोसळला. या घटनेनंतर शहजाद पूनावालाच्या टीमने अधिकृत निवेदन जारी करत या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

नेमका कशावरून झाला वाद?

शोच्या पहिल्याच आठवड्यात ‘अल्टीमेट रूलर’ ठरवण्यासाठी एका विशेष जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. ‘अल्टीमेट रूलर’ला शोमधील महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार मिळतात, तसेच तो पहिल्या आठवड्यातील एलिमिनेशनपासून (फॉल) सुरक्षित राहतो. या प्रक्रियेत सर्व रूलर्सना एका कमकुवत स्पर्धकाचे नाव सुचवायचे होते.

यादरम्यान प्रियंकाने सिवेतचे नाव घेतले, तर शहजाद पूनावालानेही सिवेत तोमरलाच नॉमिनेट केले. शहजादने नाव घेताच सिवेतचा पारा चढला. सिवेतचे आक्रमक वर्तन आणि शिवीगाळ करण्याची सवय ‘पेंटहाउस’च्या वातावरणासाठी योग्य नाही, असा आक्षेप शहजादने घेतला होता. याच मुद्द्यावरून सिवेतने शहजादवर अचानक हल्ला केला.

“हिंमत आणि ताकद मोडू शकत नाही”; शहजादच्या टीमचे निवेदन

या घटनेनंतर शहजाद पूनावालाच्या अधिकृत टीमने सोशल मीडियावर एक परिपत्रक जारी करत सिवेतच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला. निवेदनात म्हटले आहे:

“तो या शोमध्ये खेळण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आणि स्वतःची उपजीविका भागवण्यासाठी आला होता. असे असतानाही तुम्ही त्याला शिवीगाळ केली आणि त्याच्यावर मागून शारीरिक हल्ला केला.”

शहजादच्या वैयक्तिक संघर्षाचा उल्लेख करत टीमने पुढे म्हटले, “शहजादने लहानपणीच वडिलांना गमावले आहे. त्याची आई वयोवृद्ध आहे आणि वैचारिक मतभेदांमुळे भावाशीही त्याचे चांगले संबंध राहिलेले नाहीत. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत तो या शोमध्ये आपले काम करण्यासाठी आला होता. जेव्हा त्याला चिथावणी देण्याचा प्रयत्न झाला, तेव्हाही त्याने अतिशय संयमाने आणि आदराने उत्तर दिले. यावरून तुमच्या मानसिकतेची पातळी दिसून येते.”

प्रेक्षकांचे मानले आभार

टीमने शेवटी असा इशारा दिला की, “लोक सर्व काही पाहत आहेत. तुम्ही त्याला शांत करण्याचा किंवा खाली खेचण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याची हिंमत आणि ताकद मोडू शकत नाही. तो प्रत्येक वेळी अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील.” तसेच कठीण काळात पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानत निवेदनाचा शेवट ‘जय हिंद!’ने करण्यात आला.

सध्या या हाणामारीचा व्हिडिओ आणि शहजादच्या टीमचे निवेदन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटिझन्सकडून सिवेत तोमरच्या या हिंसक वर्तनावर जोरदार टीका होत आहे.