Rishi Sunak meets PM Modi in New Delhi : ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि सार्वजनिक सेवेत २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींच्या वचनबद्धतेची आणि कार्यसंस्कृतीची प्रशंसा करत सुनक म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-ब्रिटन संबंध अधिक मजबूत होत चालले आहेत.

वचनबद्धता, कार्यसंस्कृती आणि ऊर्जा सर्वांसाठी आदर्श

‘X’ वरील एका पोस्टमध्ये सुनक यांनी पंतप्रधान असताना पीएम मोदींसोबत काम केल्याच्या आठवणींना उजाळा दिला आणि व्यापार, तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) या क्षेत्रांत दोन्ही देशांमधील अधिक घट्ट सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला.ऋषी सुनक यांनी लिहिलं, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज नवी दिल्लीत तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. सार्वजनिक सेवेतील २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन, हे एक उल्लेखनीय यश आहे. मी पंतप्रधान असताना तुमच्यासोबत काम करणे हा एक उत्तम अनुभव होता.” मोदींच्या सार्वजनिक सेवेतील दृष्टिकोनाचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “तुमची वचनबद्धता, तुमची कार्यसंस्कृती आणि तुमची ऊर्जा आपल्या सर्वांसाठी एक आदर्श आहे.”

द्विपक्षीय संबंधांवर बोलताना सुनक म्हणाले, “तुमच्या नेतृत्वाखाली ब्रिटन-भारत संबंध सातत्याने मजबूत होत आहेत. अनपेक्षित बदल घडणाऱ्या या जगात आपल्या दोन्ही देशांनी व्यापार, तंत्रज्ञान आणि एआय (AI) वर अधिक सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे.” या भागीदारीच्या भविष्याबद्दल विश्वास व्यक्त करत त्यांनी लिहिलं, “मला खात्री आहे की येत्या काही वर्षांत ब्रिटन आणि भारत एकमेकांच्या आणखी जवळ येत राहतील.”

तत्पूर्वी मंगळवारी, सुनक यांनी बदलत्या जागतिक व्यवस्थेबद्दल आणि वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेच्या काळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवण्याच्या भारत आणि आखाती देशांच्या वाढत्या क्षमतेबद्दल भाष्य केले. नवी दिल्लीतील ‘ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम २०२६’ मधील “द एंड ऑफ प्रेडिक्टॅबिलिटी” या पॅनेल चर्चेत बोलताना सुनक म्हणाले की, जग आता जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या बहुपक्षीय, नियमांवर आधारित चौकटीपासून दूर जात आहे.

ते म्हणाले, “आम्ही सगळे अशा एका बहुपक्षीय नियमांवर आधारित चौकटीत गुंतवणूक करत आणि काम करत मोठे झालो, जी मुख्यत्वे अमेरिकेकडून लागू केली गेली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे याचे कारण नसून, ते या बदलाचे एक लक्षण आहेत आणि आपण आता अशा जगात आहोत जिथे परिस्थिती नेमकी कुठे स्थिरावणार आहे हे आपल्याला माहित नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात भू-राजकीय अनिश्चितता आणि धोका निर्माण होत आहे.”