पीटीआय, लंडन : भारतात दिवाळी साजरी होत असताना ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी आपल्याकडे निर्धारित वेळेत (स्थानिक वेळेनुसार सोमवारी दुपारी २ वा.) केवळ एकच नामांकनपत्र आल्याचे हुजूर पक्षाच्या खासदारांच्या ‘१९२२ समिती’चे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी जाहीर करीत नेतेपदाच्या शर्यतीत सुनक विजेते ठरल्याची घोषणा केली. त्यामुळे लंडनमधील ‘१० डाऊिनग स्ट्रीट’ या ब्रिटिश राजकारणाच्या केंद्रस्थानाकडे सुनक यांची वाटचाल सुरू झाली आहे.




पंतप्रधानपदासाठी स्पर्धेत न उतरण्याचा निर्णय माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी जाहीर केला. त्यामुळे हुजूर पक्षाच्या नेतृत्वपदासाठी आणि पंतप्रधानपदासाठी सुनक यांचे पारडे जड झाले होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेताना जॉन्सन म्हणाले की, आपण पुन्हा पंतप्रधानपदाची सूत्रे घ्यावीत, यासाठी ही योग्य वेळ नाही. नेतेपदासाठी आवश्यक खासदारांचा पाठिंबा मिळण्याची मुदत सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २ वाजता संपली. तेव्हा सुनक यांनी १४२ सदस्यांचा पाठिंबा मिळवून आघाडी घेतली होती. हुजूर पक्षाच्या जॉन्सनसमर्थक सदस्यांनीही सुनक यांना पाठिंबा जाहीर केला. त्यात माजी गृहमंत्री प्रीती पटेल, मंत्री जेम्स क्लेव्हर्ली, नदीम जहावी यांचा समावेश होता. गेल्या महिन्यात लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर मंत्रिमंडळातून पायउतार झालेल्या भारतीय वंशाच्या माजी गृहमंत्री पटेल म्हणाल्या की, नवा नेता म्हणून सुनक यांना संधी देण्यासाठी आमच्या खासदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे.
माजी अर्थमंत्री म्हणून सुनक यांचा विजय त्यांच्या राजकीय प्राक्तनात उल्लेखनीय बदल घडवून आणणारा आहे. ते आपल्या राजकीय सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. मात्र गेल्या महिन्यात त्यांची ही लोकप्रियता पाठिंब्यात परावर्तित झाली नाही. परिणामी, मावळत्या पंतप्रधान लिझ ट्रस यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मावळत्या पंतप्रधान ट्रस यांच्या नेतृत्वाविरोधात त्यांच्याच हुजूर पक्षातील सहकाऱ्यांनी उघडपणे बंड केल्यानंतर त्यांनी गेल्या गुरुवारी राजीनामा दिला. त्यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द केवळ ४५ दिवसांची ठरली. छोटय़ा अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या करसवलती मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती.
कोण आहेत सुनक?
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ४२ वर्षीय ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचा जन्म साउथॅम्प्टनमध्ये झाला. त्यांचे वडील यशवीर हे डॉक्टर, तर आई उषा या फार्मासिस्ट आहेत. सुनक यांचे आजी-आजोबा मुळचे पंजाबचे. त्यांचे शिक्षण प्रख्यात विन्चेस्टर कॉलेजमध्ये झाले. त्यांनी तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण ऑक्सफर्डमध्ये घेतले, तर कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पदवी घेतली. सुमारे तीन वर्षे त्यांनी खासगी कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केले. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता यांची आणि सुनक यांची भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली. २००९मध्ये ते विवाहबद्ध झाले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का या मुली आहेत.
पाहा व्हिडीओ –
आव्हाने काय?
ब्रिटनची अर्थव्यवस्था महागाई आणि वाढते व्याजदर यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या घातक परिस्थितीचा सामना करत आहे. युक्रेन युद्धामुळे या वर्षी दुसऱ्यांदा वीजदेयके वाढली आहेत. चलन बाजारात स्टर्लिगची परिस्थित नाजूक आहे.
मावळत्या पंतप्रधान लिझ
ट्रस यांची करकपातीची निधी नसलेली योजना आणि महागडी वीजदेयकहमी यामुळे बाजार कोसळल्यानंतर ब्रिटनची आंतरराष्ट्रीय आर्थिक विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे.
आर्थिक भूमिका..
- हुजूर पक्षाच्या पारंपरिक, लोकानुनयी भूमिकेनुसार करकपातीची आश्वासने देण्यापेक्षा महागाईवर लक्ष केंद्रित करण्याबाबत सुनक ठाम राहिले.
- मी या संसदेत करकपात करीन, पण ते जबाबदारीने. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी मी कर कमी करत नाही, तर मी कर कमी करण्यासाठी निवडणुका जिंकतो, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
- करोना विषाणूच्या जागतिक साथीला रोखण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जॉन्सन यांनी देशभर टाळेबंदी जाहीर केल्यानंतर सुनक यांनी लाखो नोकरदारांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी मोठय़ा आर्थिक योजना आखल्या.
सहा वर्षांत चार पंतप्रधान..
ब्रिटनने गेल्या सहा वर्षांत मोठी राजकीय अस्थिरता अनुभवली. सहा वर्षांत चार पंतप्रधान झाले. थेरेसा मे यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द तीन वर्षे १२ दिवसांची होती. ब्रेग्झिट प्रकरणात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधान बनले. त्यांनाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्यानंतर लिझ ट्रस पंतप्रधानपदी आल्या. त्यांची कारकीर्द अल्पजीवी ठरली. करकपातीच्या मुद्यावर अवघ्या ४५ दिवसांत त्यांना पायउतार व्हावे लागले. आता सुनक हे चौथे पंतप्रधान आहेत.
मोदींकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांचे अभिनंदन केले. जागतिक मुद्दे हाताळण्याबरोबरच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी उत्सुक आहे, असे ट्विट मोदी यांनी केले.