भारतीय वंशाचे ब्रिटनचे नेते ऋषी सुनक यांनी आज (२५ ऑक्टोबर) पंतप्रधनापदाचा पदभार स्वीकारला. प्रथेप्रमाणे ब्रिटनचे राजा किंग चार्ल्स यांनी सुनक यांची अधिकृतरित्या ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत. शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती.

हेही वाचा >>> ऋषी सुनक यांची तुलना ‘अल-कायदा’शी; रेडिओवरील कार्यक्रमात मुक्ताफळं, सुनक ब्रिटिश नसल्याचा दावा करताच निवेदिकेनं…

पदभार स्वीकारल्यानंतर सुनक काय म्हणाले?

आपल्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यासमोर उभा आहे. मी देशाच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे विचार करणार आहे. माझ्या पक्षाच्या विचाराप्रमाणे मी सरकार चालवण्याचा प्रयत्न करेन. आगामी काळात आपण सगळे सोबत आलो तर खूप काही करू शकतो, असे ऋषी सुनक पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले.

सुनक यांना १४२ खासदारांचा पाठिंबा

हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली होती. त्यानंतर हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.

हेही वाचा >>> “ज्यांनी भारतावर राज्य केलं, आता त्याच ब्रिटनचा..,” ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड होताच दिग्गजांच्या प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून आर्थिक आघाडीवर ब्रिटनची स्थिती खालावली आहे. याच काणामुळे अवघ्या ४५ दिवसांत लिझ ट्रस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ऋषी सुनक दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरले होते. पहिल्यांदा त्यांना पंतप्रधानपदाने हुलकावणी दिली होती. मात्र यावेळी विरोधात तूल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्यामुळे सुनक दुसऱ्या प्रयत्नात ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यात यशस्वी झाले. ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी केवळ एकच नामांकनपत्र आल्याचे हुजूर पक्षाच्या खासदारांच्या ‘१९२२ समिती’चे अध्यक्ष सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी सुनक यांची नेतेपदी निवड केली होती. त्यानंतर आज (२५ ऑक्टोबर) त्यांनी किंग चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला आहे.