ऋषिकेश (उत्तराखंड): उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील योग नगरी रेल्वे स्टेशनजवळ सोमवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. नियमित देखभालीचे काम सुरू असताना उज्जैन एक्सप्रेसचे तीन डबे रुळावरून घसरले. प्राथमिक अंदाजानुसार, ट्रेनचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार रात्री साडेनऊच्या सुमारास खांड गाव परिसरात ही घटना घडली. सुदैवाने, या घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
ब्रेक फेल झाल्यामुळे दुर्घटना?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या रेल्वे गाडीचे नियमित मेंटेनन्सचे काम सुरू असताना अचानक ब्रेक फेल झाले आणि ट्रेनचे तीन डबे रुळावरून खाली उतरले. मात्र, मेंटेनन्स दरम्यान पूर्ण ट्रेन अचानक कशी काय पुढे सरकली? याबाबत आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तब्बल अडीच तासांनंतर अधिकारी घटनास्थळी?
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपघात घडल्यानंतर तब्बल अडीच तासांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप स्थानिक पातळीवर केला जात आहे.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रेल्वे ट्रॅकच्या आसपास मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (GRP) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत नागरिकांना सुरक्षित अंतरावर हटवले. रेल्वे विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, नेमकी चूक कुठे झाली याचा तपास सुरू आहे. या घटनेबाबत रेल्वेकडून अधिकृत सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे.
