ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या तब्बल ५९ आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता मिळाली आहे. या ५९ आमदारांच्या गटाचं नेतृत्व आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे करत आहेत. आता याच ऋतब्रता बॅनर्जी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.

‘आमच्या गटातील आमदारांची संख्या आणखी वाढेल’, असा नवा दावा ऋतब्रता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर नवं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. कारण ८० आमदारांपैकी तब्बल ५९ आमदारांनी बंडखोरी केली आहे. आता राहिलेले आमदारही या गटात सामील होणार असल्याचा दावा ऋतब्रता बॅनर्जी यांनी केल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

ऋतब्रता बॅनर्जी यांनी काय म्हटलं?

तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले नेते ऋतब्रता बॅनर्जी यांनी दावा केला की ते नेतृत्व करत असलेल्या बंडखोर टीएमसी गटाला मिळणारा पाठिंबा आणखी वाढतच राहणार आहे. कारण पश्चिम बंगाल विधानसभेतील पक्षाच्या संख्याबळातील आमदारांच्या एका मोठ्या गटाचा त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसेच बंडखोर टीएमसी गटाच्या संपर्कात टीएमसीचे कोणतेही खासदार नसल्याचा खुलासा देखील त्यांनी केला.

“मी आता फक्त एकच गोष्ट सांगतो की आमची संख्या वाढत राहणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे. आमची संख्या कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता आणखी थोडी वाट पाहा. आमदारांच्या संख्येबाबत बोलायचं झालं तर, ती वाढणारच आहे”, असं ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

टीएमसी पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?

पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “तृणमूल काँग्रेस पक्षाने आपला पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभं राहून वंदन करण्यास सांगितलं गेलं होतं”, अशी टीका ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती.

तसेच ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थी राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या एसएफआय संघटनेतून केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ते टीएमसीमध्ये सामील झाले होते. तसेच ते टीएमसी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्षही होते. २०१४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते आणि २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्वा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून आमदार झाले आहेत. दरम्यान, आता ऋतब्रता बॅनर्जी हे टीएमसीच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करत आहेत.