Ritabrata Banerjee Sexual Misconduct Allegation: तृणमूल काँग्रेसच्या फुटीर गटाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतब्रता बॅनर्जी यांच्यावर ममता बॅनर्जी गटाचे आमदार कुणाल घोष यांनी गंभीर आरोप केले आहेत. ऋतब्रता बॅनर्जी पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील आहेत. लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या आरोपांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची दखल घेऊन आता ऋतब्रता बॅनर्जी यांच्याविरोधातील आरोपांची चौकशी करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला दिले आहेत.
आरोपांच्या चौकशीचे निर्देश
चौकशीचे निर्देश देणारे पत्र गृह मंत्रालयाने बंगालच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. “या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन चौकशी करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल आमदार कुणाल घोष यांना पाठवावा,” असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कुणाल घोष यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात ऋतब्रता यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे मागणीही घोष यांनी केली आहे.
आमदार घोष यांनी पत्रात काय म्हटलंय?
लैंगिक अत्याचाराशी निगडीत प्रकरण डपण्यासाठी किंवा त्यावर प्रभाव टाकण्यासाठी ऋतब्रता यांनी राजकीय संबंधांचा वापर केला आहे का? याची चौकशी करण्याची मागणीही घोष यांनी शाहांना लिहलेल्या पत्रातून केली आहे. तक्रारदार महिलेचे पुढे काय झाले, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे, असेही घोष यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल सरकार ऋतब्रता बॅनर्जी यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी मला आशा असल्याचे घोष यांनी म्हटलंय.
नेमके प्रकरण काय?
आमदार कुणाल घोष यांनी उल्लेख केलेले प्रकरण २०१७ मधील आहे. ३० वर्षीय एका महिलेने ऋतब्रता यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप केला होता. या महिलेने ऋतब्रता यांच्याबरोबरचे काही खासगी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांना टॅग केले होते. या प्रकरणी बालुरघाट पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यावेळी ऋतब्रता यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ऋतब्रता यांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. पश्चिम बंगाल सीआयडीने ऋतब्रता यांची चौकशीही केली होती. मात्र, २०१८ मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर हे प्रकरण थंडावले.
