TMC Split Ritabrata Banerjee Rebellion Updates : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तृणमूल काँग्रेसचा विधानसभेत पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर पक्षातील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्यावतीने एक बैठक बोलवण्यात आली होती, त्या बैठकीला ८० आमदारांपैकी तब्बल ६० आमदारांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसबाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केलेले आमदार संदीपान साहा आणि आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी बुधवारी पश्चिम बंगाल विधानसभेत त्यांना ५० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तसेच तृणमूल काँग्रेसमधील गटाचे आपण नेते असल्याचा दावा करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं अशी मागणी ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे आता बंगालचे नवे विरोधी पक्षनेते बनले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर थेट तृणमूलच्या नेतृत्वाला आव्हान देत ऋतब्रता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. तसेच आपल्याला ५९ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं होतं, त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मंजुरी देत ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

ऋतब्रता बॅनर्जी यांनी काय प्रतिक्रिया दिली?

पश्चिम बंगालमधील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आणि बनावट सह्यांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आणि बंडखोरीबाबत पत्रकारांशी बोलताना ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी या त्यांच्या नेत्या असून पक्षात फूट पाडण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचं भाष्य केलं. विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत ऋतब्रता बॅनर्जी म्हणाले की, “आम्ही प्रमुख विरोधी पक्ष आहोत. आम्ही एक संघ म्हणून लढलो आहोत.”

नेमकं काय घडलं?

तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाला झुगारून तब्बल ५८ आमदारांनी विधानसभेचे अध्यक्ष रथींद्रनाथ बोस यांना एक पत्र सादर करून ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित केलं होतं. या बंडखोर आमदारांनी असा दावा केला की, त्यांच्या गटाला टीएमसीचा ‘खरा’ विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी. यामध्ये टीएमसीचे आमदार जावेद खान, संदीपान साहा, सबीना यास्मिन आणि सेउली साहा यांची सभागृहात उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आमदार अख्रुझमान यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यना, गेल्या आठवड्यात टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाचे सरचिटणीस या नात्याने विधानसभेच्या अध्यक्षांना एक पत्र लिहून सोभनदेव चट्टोपाध्याय यांचं नाव विरोधी पक्षनेते म्हणून प्रस्तावित केलं होतं. मात्र, सोभनदेव यांना पाठिंबा देणाऱ्या अनेक टीएमसी आमदारांच्या सह्या बनावट असल्याचा आरोप ऋतब्रता बॅनर्जी यांनी केला होता, त्यांच्या या आरोपानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारला नव्हता.

ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?

पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. “पक्षाने आपला पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभे राहून वंदन करण्यास सांगितले”, अशी टीका बॅनर्जी यांनी केली.

Ritabrata Banerjee leader of opposition

ममता बॅनर्जींनी दिलेल्या नेत्याला स्वीकारण्यास विरोध

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेतेपदी सोवनदेब चट्टोपाध्याय यांचे नाव सुचवले होते. मात्र बंडखोर आमदारांच्या गटाचा चट्टोपाध्याय यांना विरोध आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांच्याबरोबर निलंबित केलेले आमदार संदीपान साहा यांना माध्यमांनी विचारले की, तुम्हाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, त्यावर ते म्हणाले की, दोन तृतीयांश संख्येपेक्षा अधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे.

महाराष्ट्र ‘मॉडेल’ राबविण्याचा प्रयत्न

तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितलं की, आमच्या पक्षाचे काही आमदार बंगालमध्ये महाराष्ट्र मॉडेल राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ज्याप्रमाणे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतःच्या ताब्यात घेतले. पक्षाचे नाव आणि चिन्ह हिसकावले. त्याप्रमाणे तृणमूल काँग्रेसला ताब्यात घेण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे.

ममता बॅनर्जींचा प्रभाव ओसरला?

विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तृणमूलमधील अनेक नेते ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भूमिका घेऊ लागले आहेत. अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जींनी बोलावलेल्या बैठकांना अनुपस्थिती लावली. ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर दोन दिवसांनी ६ मे रोजी ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीला ८० पैकी ७१ आमदार उपस्थित होते. १९ मे रोजी आयोजित केलेल्या बैठकीला ६५ आमदार उपस्थित होते. तर ३१ मे रोजी बोलवलेल्या बैठकीला केवळ २० आमदारांनी हजेरी लावली होती.