सौदी अरेबियाच्या रियाध येथील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या भीषण हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० हून अधिक भारतीय जखमी झाले आहेत. या हल्ल्यात तब्बल १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये ११ भारतीय नागरिकांचा समावेश असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर सौदीतील भारतीय दूतावास सतर्क झाला असून जखमींच्या प्रकृतीवर आणि स्थानिक प्रशासनाच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. या संदर्भातील वृत्त PTI या वृत्तसंस्थेने दिले आहे.

रियाध विमानतळावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय दूतावासाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दूतावासाने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच भारतीय अधिकाऱ्यांनी तत्काळ स्थानिक प्रशासन आणि रुग्णालय व्यवस्थापनाशी संपर्क साधला. जखमी झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना योग्य ते वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री केली जात असून, दूतावास त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सतत संपर्कात आहे.

सौदी अरेबियातील विमानतळाला लक्ष्य करून करण्यात आलेला हा गेल्या आठवड्यातील तिसरा मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात ठार झालेल्या १२ नागरिकांमध्ये सौदीचे ४ नागरिक, बांगलादेशचे २, तर अमेरिका, पॅलेस्टाईन, इजिप्त, जॉर्डन, सीरिया आणि सुदान येथील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास या घटनेवर सातत्याने लक्ष ठेवून असून, बाधित भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.