Riyadh Airport Houthi Attack: सौदी अरेबियाने दिलेल्या माहितीनुसार, येमेनच्या हुथी बंडखोरांनी त्यांची राजधानी रियाधजवळील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात किमान १२ जण ठार झाले असून ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. सौदीच्या जनरल अथॉरिटी ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (GACA) सांगितले की, शनिवारी झालेल्या या हल्ल्यात किमान चार सौदी नागरिक आणि दोन बांगलादेशी नागरिक मारले गेले. अल जझिराने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
सौदीच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील मृतांमध्ये चार सौदी नागरिक, दोन बांगलादेशी आणि अमेरिका, जॉर्डन, पॅलेस्टाईन, सीरिया, सुदान व इजिप्तमधील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरद्वारे मोठ्या संख्येने जखमींना आणले जात असल्याने रुग्णालयांवर प्रचंड ताण आला होता, तसेच काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
हा हल्ला कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय झाला आणि सौदी अरेबियाच्या धोक्याची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणेने कोणताही इशारा जारी केला नाही. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर या आठवड्यात झालेल्या दोन आधीच्या हल्ल्यांमध्ये चार जण मारले गेले होते आणि धावपट्टीवर (टारमॅक) पार्क केलेल्या सौदीच्या एका व्यावसायिक विमानाचे मोठे नुकसान झाले होते.
ताज्या हल्ल्याच्या अहवालांवर प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी याला भयानक म्हटलं. तसेच वॉशिंग्टन सध्या आपल्या पर्यायांवर विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. वॉशिंग्टन सौदी अरेबियाच्या हुथींविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये सामील होण्याची योजना आखत आहे का, असे विचारले असता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “आम्ही कदाचित सामील होऊ. आम्ही यावर विचार करत आहोत. आम्हाला नुकतीच या हल्ल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे आम्ही निर्णय घेऊ. आम्ही खूप वेगाने हालचाली करतो.”
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी शनिवारी सौदी अरेबियावरील या ताज्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचाही समावेश असल्याचे स्पष्ट केले.
