नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. बिहारमध्ये विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. आघाडीतून राजदने  काँग्रेसला जागा दिली नसल्याबद्दल  विचारले असता, आम्ही त्यांना एक जागा अनामत रक्कम जप्त होण्यासाठी द्यायची काय? असा प्रतिसवाल लालूंनी केला. काँग्रेसशी आघाडी काय असते, अशा शब्दांत लालूंनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्तचरण दास यांचीही त्यांनी खिल्ली उडवली. राज्यात राजद-काँग्रेस आघाडी नसल्याचे भक्तचरण दास यांनी जाहीर केले आहे. डॉक्टरांशी सल्लामसलत करूनच प्रचारात सहभागी व्हायचे की नाही ते ठरवू, असे लालूप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. दिल्लीत एम्समध्ये लालूंवर उपचार सुरू होते. ३० ऑक्टोबरला बिहारमध्ये दोन पोटनिवडणुका होत आहेत. सत्ताधारी संयुक्त जनता दलाविरोधात राष्ट्रीय जनता दल असा सरळ सामना येथे आहे. गेल्या वर्षी लढविलेल्या जागेवर राजदने उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये संताप आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या खराब कामगिरीने राजदने त्यांना कुशवर अस्थन या मतदारसंघातील जागा सोडण्यास नकार दिला आहे. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.