रॉबर्ट वडेरा यांचे हरियाणा गावातील जमीन व्यवहार प्रकरण पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासाठी समस्या बनत असल्याचे दिसते. वडेरा यांनी गुडगाव येथे ३.५३ एकर जमीनच्या कागदपत्रांमध्ये फसवणूक करून व्यवसायिक परवान्यावर नफा कमावल्याचा आरोप आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी केला. वडेरा-डीएलएफ यांच्यातील व्यवहाराच्या चौकशी प्रकरणी गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात हरियाणा सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीमध्ये विस्तृत अहवाल सादर करण्यात आला होता.
गुडगावच्या शिकोहपूर गावात ३.५३ एकर जमिनीसाठी वडेरांनी फसवा व्यवहार केला असे खेमका यांचे म्हणणे आहे. आयएएस अधिकारी म्हणाले की, क्षेत्रीय योजना विभागाने (डीटीसीपी) नियम आणि अधिनियमांना डावळून करून दलाल रुपातील भांडवलदारांना आपले खिसे भरण्याची अनुमती दिली. त्याचबरोबर डीटीसीपीच्या मदतीने वडेरा यांनी फसवा व्यवहार केल्याचा आरोप खेमका यांनी केला आहे.
खेमका यांनी २१ मे रोजी आपले म्हणणे सादर केले होते. त्यानुसार, १२ फेब्रुवारी २००८रोजीच्या दोन्ही विक्री करारांमध्ये वडेरा यांच्या स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी कंपनीने ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून जमीन खरेदी केली. त्यानंतर वडेरांना नफा मिळावा यासाठी मार्च २००८ ला डीटीसीपीकडून व्यवसायिक परवाना मिळविण्यासाठीचे पत्र व्यवहार करण्यात आला. हा व्यवहारही खोटा होता,असे त्यांचे म्हणणे आहे.