Robot Harasses Girl Germany Police Seize : तरुण मुलीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली जर्मनीमध्ये पोलिसांनी एका रोबोटला जप्त केलं आहे. जर्मनीच्या कोलोन शहरातील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर या रोबोटने एका १६ वर्षांच्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेचे दोन तरुणांकडून सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. ‘डेली मेल’च्या वृत्तानुसार, ही घटना रविवारी घडली.
कोलोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी Hohenzollernring येथील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर तिच्या मित्रांसोबत उभी होती. दरम्यान, सुमारे १.२ मीटर उंचीचा लाल आणि सोनेरी रंगाचा एक रोबोट मागून तिच्याजवळ आला. त्याने तिला चुकीचा स्पर्श केला आणि तिच्या दिशेने आक्षेपार्ह हालचाली करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितलं की, या रोबोटचा १६ वर्षांचा मालक आणि त्याच्या १९ वर्षांच्या साथीदाराने या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केलं, सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीम केलं आणि त्यावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या.
कारच्या डिकीत आढळला रोबोट
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. अधिकाऱ्यांनी मॅग्नसस्ट्रासे आणि होहेनझोलर्नरिंगच्या छेदनबिंदू जवळ संशयितांना शोधून काढले. तिथं एका फॉक्सवॅगन कारच्या डिकीमध्ये हा रोबोट लपवून ठेवलेला आढळला. पोलिसांनी सांगितलं की, वेगबर्ग येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलाने पोलीस येण्यापूर्वीच तो रोबोट कारमध्ये लपवला होता. तपासाचा भाग म्हणून अधिकाऱ्यांनी तो रोबोट आणि संशयितांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
लैंगिक छळाच्या अँगलने पोलिसांचा तपास
संशयितांनी रिमोट कंट्रोलद्वारे या रोबोटचे नियंत्रण केल्याचा संशय आल्यानंतर कोलोन पोलिसांनी या प्रकरणाचा फौजदारी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आपल्या निवेदनात या घटनेचं वर्णन हल्ला असं केलं असून ते लैंगिक छळाचे गुन्हे दाखल करण्याचा विचार करत आहेत.
कोलोन पोलिसांनी ‘डेली मेल’ला दिलेल्या निवेदनात म्हटल आहे की, “गुन्हे अन्वेषण विभाग आता या घटनेच्या वेळी रोबोट कसा काम करत होता आणि कोणीतरी जाणूनबुजून त्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवत होतं का, याचा तपास करत आहे. अधिकाऱ्यांनी रोबोट आणि संशयितांचे दोन मोबाईल फोन जप्त केले असून, गुन्हे अन्वेषण विभाग लैंगिक छळाच्या संशयावरून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.”
