बिहार विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू प्रसाद यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला होता. लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे यादव कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जात होतं. या सर्व घडामोडीनंतर आता पुन्हा एकदा रोहिणी आचार्य यांनी एक पोस्ट शेअर करत सध्याच्या राष्ट्रीय जनता दलाच्या धोरणावरून जोरदार टीका केली आहे.
राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) बिहार विधानपरिषद निवडणुकीसाठी ६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आरजेडीने शुक्रवारी विधानपरिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. या निवडणुका चार शिक्षक मतदारसंघ आणि चार पदवीधर मतदारसंघांमधील जागांसाठी होणार आहेत. मात्र, या विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवारांवरून रोहिणी आचार्य यांनी संताप व्यक्त करत तेजस्वी यादव यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
‘विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या संधीसाधूंना उमेदवारी देणं म्हणजे निष्ठावान ‘लालू समर्थकां’चा विश्वासघात आहे, एवढंच नाही तर लालूजींची विचारधारा, पक्षाची मूळ तत्त्वे आणि संघटनेची ताकद यांनाही हा मोठा धक्का आहे’, असं म्हणत रोहिणी आचार्य यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे ‘आरजेडी’मधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याची चर्चा बिहारमध्ये रंगली आहे.
रोहिणी आचार्य काय म्हणाल्या?
“विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या संधीसाधू व्यक्तींना प्राधान्य देणं आणि त्या बदल्यात वैचारिक निष्ठा व दीर्घ संघर्षाचा इतिहास असलेल्यांना बाजूला करणं, हा समर्पित नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांचा घोर अवमान करण्यासारखं आहे. अनेक दशकं पक्षाची आणि संघटनेची जोपासना करताना प्रसंगी पोलिसांचा लाठीमार सहन करणाऱ्या नेत्यांनाच दुर्लक्षित करणं, हे आरजेडीमधील अंतर्गत लोकशाही आणि तळागाळातील कार्यकर्त्यांबद्दलची अनास्था दर्शवतं. हा निर्णय केवळ निष्ठावान ‘लालू-समर्थकां’चा विश्वासघातच नाही, तर लालूजींची विचारधारा, पक्षाची मूळ तत्त्वे आणि संघटनेची ताकद यांनाही यामुळे मोठा धक्का बसला आहे”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य यांनी याआधी काय आरोप केले होते?
“मेहनतीने निर्माण केलेला मोठा वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्या लोकांची गरज नसते. काही आपले आणि आपल्या लोकांच्या भोवती असलेले नवे षडयंत्रकारी देखील त्यासाठी पुरेसे असतात. मात्र, ज्यांच्यामुळं आपली ओळख निर्माण झाली, ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी स्वतःची माणसं कोणाच्यातरी सांगण्यावरून जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा आश्चर्य वाटतं. जेव्हा विवेकावर पडदा पडतो आणि अहंकार डोक्यात शिरतो, तेव्हा विनाशकारी प्रवृत्ती तुमचे डोळे आणि कान बनून तुमची बुद्धी आणि शहाणपणा हिरावून घेत असते”, असं रोहिणी आचार्य यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
रोहिणी आचार्य कोण आहेत?
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना अपयश आलं होतं. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.
