Rohini Acharya On Yadav Family Split : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला आलेल्या अपयशानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं होतं. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली होती. तसेच तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे यादव कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जात होतं.

त्यानंतर आता रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून रोहिणी आचार्य यांनी यादव कुटुंब आणि राष्ट्रीय जनता दलातील गोंधळावर टीका केली आहे. ‘वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्या लोकांची गरज नसते’, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं. रोहिणी आचार्य यांच्या वक्तव्याचा रोख हा तेजस्वी यादव यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे.

रोहिणी आचार्य यांनी काय म्हटलं?

“मेहनतीने निर्माण केलेला मोठा वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्या लोकांची गरज नसते. काही आपले आणि आपल्या लोकांच्या भोवती असलेले नवे षडयंत्रकारी देखील त्यासाठी पुरेसे असतात. मात्र, ज्यांच्यामुळं आपली ओळख निर्माण झाली, ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाच्या खुणा पुसून टाकण्यासाठी स्वतःची माणसं कोणाच्यातरी सांगण्यावरून जेव्हा प्रयत्न करतात, तेव्हा आश्चर्य वाटतं. जेव्हा विवेकावर पडदा पडतो आणि अहंकार डोक्यात शिरतो, तेव्हा विनाशकारी प्रवृत्ती तुमचे डोळे आणि कान बनून तुमची बुद्धी आणि शहाणपणा हिरावून घेत असते”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.

“अपमानित केलं, शिव्या दिल्या, चप्पल…”,रोहिणी आचार्य यांनी आधीही केले होते आरोप

रोहिणी आचार्य यांनी काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. रोहिणी आचार्य यांनी याआधीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, “काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आलं, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेनं सोडलं, मला माझं माहेरचं घर सोडावं लागलं, मला अनाथ बनवण्यात आलं. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं होतं.

रोहिणी आचार्य कोण आहेत?

व्यवसायाने डॉक्टर असलेल्या रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आलेल्या रोहिणी आचार्य यांनी गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना अपयश आलं होतं. त्यांना भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.