फ्रान्सच्या सरकारी वकिलांनी न्यायालयात रोहित राणेचे वर्णन करताना तो “नाझी विचारांचा समर्थक, अत्यंत क्रूर आणि हिंसेची आवड असणारा विकृत व्यक्ती” असल्याचे सांगितले. वकिलांनी त्याला तब्बल ३० वर्षांच्या कारावासाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याच्यावर सिद्ध झालेल्या गुन्ह्यांसाठी कायद्यात असलेली जास्तीत जास्त २० वर्षांची शिक्षा सुनावली. निकाल वाचनावेळी तेथे उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाल ऐकताना रोहित राणेच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा कोणताही भाव नव्हता.
सोशल मीडियाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चिमुकल्यांचे शोषण करणाऱ्या एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचा फ्रान्समध्ये पर्दाफाश केला आहे. ‘CVLT’ नावाचे एक हिंसक आणि विकृत ऑनलाईन नेटवर्क चालवणाऱ्या आणि त्यात मुख्य भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील पुणे येथील रोहित राणे (वय २९) याला पॅरिस येथील न्यायालयाने २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.
ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडामधील अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून विकृत कृत्ये करून घेणे आणि त्यांचा शारीरिक-मानसिक छळ करणे, असा गंभीर ठपका रोहित राणेवर ठेवण्यात आला होता.
‘डिसकॉर्ड’ ॲपवरून सुरू होता जाचक खेळ
न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार आणि ‘ॲसोसिएटेड प्रेस’ (AP) च्या अहवालानुसार, या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याने अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी ‘डिसकॉर्ड’ (Discord) या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. या मुलींना मानसिकदृष्ट्या ताब्यात घेऊन त्यांना ‘गुलाम’ बनवले जात असे. रोहित राणे हा या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन टोळीचा मुख्य सूत्रधार होता. बालकांचे लैंगिक शोषण, खंडणी वसुली आणि अल्पवयीन बालकांवर अनन्वित अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.
पुण्यात जन्म, फ्रान्समध्ये क्रीडा प्रशिक्षक
मूळचा महाराष्ट्रातील पुणे शहराचा असलेला रोहित राणे फ्रान्समधील अँटिबेस या शहरात एका व्यावसायिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. त्यानंतर तो फ्रान्समध्येच एक क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करू लागला.
२०२०-२१ मध्ये अमेरिकन तपास यंत्रणांनी फ्रान्सच्या पोलिसांना रोहित राणेच्या संशयास्पद ऑनलाईन हालचालींबद्दल सावध केले. त्यानंतर दक्षिण फ्रान्समधील अँटिबेस येथून त्याला अटक करण्यात आली. सुरुवातीला त्याने हा सर्व प्रकार “गैरसमज” असल्याचे सांगून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला; परंतु नंतर तो ‘डिसकॉर्ड’ ग्रुपचा ॲडमिन असल्याचे आणि त्याला हिंसक व्हिडिओ पाहण्याची विकृत सवय असल्याचे त्याने पोलिसांसमोर कबूल केले.
‘बाधितांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले’
अमेरिकेतील पाच पीडित मुलींची न्यायालयात बाजू मांडणारे वकीलांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. “या विकृत कृत्यांमुळे निष्पाप बाधितांचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे,” असे ते म्हणाले.
वकील पुढे म्हणाले, “पीडितांची न्यायालयाकडून एकच अपेक्षा होती—गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अशी कडक शिक्षा व्हावी, ज्यामुळे समाजात एक स्पष्ट संदेश जाईल. अशी कृत्ये कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाहीत आणि ही व्यक्ती पुन्हा समाजात जाऊन असा गुन्हा करू शकणार नाही, याची खात्री या निकालाने झाली पाहिजे.”
