हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा आत्महत्या करणारा संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नेमलेला एक सदस्यीय आयोग १ ऑगस्टला अहवाल सादर करणार आहे. या आयोगाला नुकतीच मुदतवाढ देण्यात आली. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने चौकशी आयोगाला मुदतवाढ देण्याची अधिसूचना जारी केली आहे. वेमुला याच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी त्याला राजकीय वादाचे रूप दिले होते व नंतर केंद्र सरकारवर टीका केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार रूपनवल यांच्या आयोगाने या प्रकरणातील अनेक संबंधितांची भेट घेतली असून आलेल्या अनेक निवेदनांची दखल घेतली आहे त्यामुळे त्यावरून निष्कर्ष काढण्यास आणखी तीन महिने लागणार आहेत.
मंत्रालयाने आयोगाला १ ऑगस्ट २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. वेमुला याच्या आत्महत्येनंतर राजकीय वादावादी झाली होती त्यानंतर मंत्रालयाने जानेवारीत त्याबाबत चौकशीसाठी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला होता. हा न्यायिक आयोग असून त्यात घटनाक्रम, नेमकी परिस्थिती, ठोस बाबी व विद्यापीठात आवश्यक सुधारणा या मुद्दय़ावर विचार केला जात आहे.