अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील ‘अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’च्या बाहेर असलेला अमेरिकेचे माजी अध्यक्ष थियोडोर रुझवेल्ट यांचा पुतळा हटवण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूच्या निषेधार्थ अमेरिकेत सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं संग्रहालयाने एका निवेदनात म्हटलं आहे.
‘गेल्या काही आठड्यांपासून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे वंशवादाचे शक्तिशाली आणि हानिकारक प्रतीक म्हणून पुतळे आणि स्मारके असल्याचं समोर आलं आहे. पुतळा शहराच्या मालकीचा असला तरी, यापुढे पुतळा राहू नये आणि त्याला हलवावे अशी विनंती केली आहे’, असे निवेदनात म्हटले आहे. संग्रहालयाच्या अधिकार्यांनी या स्मारकाच्या विवादास्पद स्वरूपाचा उल्लेख करताना यामध्ये ‘एक व्यक्ती घोडाच्या पाठीवर बसलीये तर अन्य त्यामागे पायपीट करत आहेत’, असं नमूद केलं आहे. पुतळा केव्हा हटवला जाईल याबाबतची नेमकी माहिती संग्रहालयाकडून देण्यात आलेली नाही. पण, पुतळा वर्णद्वेषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुतळा हटवण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, रविवारी न्यू यॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी “समस्याग्रस्त” स्मारक काढून टाकण्याच्या संग्रहालयाच्या विनंतीचे समर्थन करतो असे निवेदनात म्हटले आहे. थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होण्यापूर्वी न्यूयॉर्क राज्याचे गव्हर्नर होते. तर, रूझवेल्ट यांचे वडील न्यू यॉर्क शहरातील अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीच्या संस्थापकांपैकी एक होते. ” थिओडोर रुझवेल्ट (1858-1919) हे एक निसर्गसंपन्न आणि नैसर्गिक इतिहासाचे लेखक होते, त्यामुळे हा पुतळा त्यांच्या आठवणीत उभारण्यात आला होता. पण हा पुतळा वर्णद्वेषी असल्यामुळे संग्रहालय आणि सदस्यांना त्रासदायक वाटतोय” असं संग्रहालयाकडून नमूद करण्यात आलं आहे.
आफ्रिकन -अमेरिकी नागरिक जॉर्ज फ्लॉइड याचा पोलिसांच्या अत्याचारात मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ सुरू झालेल्या निदर्शनांचे हिंसक रूप आता पालटले असून आता शांततामय पद्धतीने निदर्शने सुरू आहेत. सुरुवातीला या निदर्शनांचे रुप फार हिंसक होते.