झारखंडमधील देवघर इथं त्रिकुट पर्वतावर रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी चालू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन आता संपलं आहे. साधारणपणे ४५ तास चाललेल्या या प्रयत्नांनतर हवेत अधांतरी अडकलेल्या लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दोघांचा मृत्यू बचावकार्यादरम्यान झाला आहे.


रविवारी संध्याकाळी ४ वाजता त्रिकुट पर्वतावर रोपवेचे दोन डबे एकमेकांवर आदळले. या अपघातामुळे ५० हून अधिक लोकांना घेऊन जाणाऱे सहापेक्षाही अधिक डबे हवेतच अडकले. ज्यावेळी ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही जण जखमी झाले, ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. यानंतर स्थानिक प्रशासन आणि हवाई दल तसेच इतर एनडीआरएफच्या जवानांनी ४५ तास रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं.


या दुर्घटनेत आत्तापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या बचावकार्यादरम्यान एक महिला दोरीवरून घसरुन पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. या आधी काल एक व्यक्ती हेलिकॉप्टर जवळ पोहोचला पण तिथून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. बचावकार्य करणाऱ्या जवानांच्या मते हे एक अवघड बचावकार्य होतं कारण लोक हजारो मीटर उंचीवर अडकले होते, त्यांच्याजवळ पोहोचणं अवघड होतं. रोपवेच्या डब्यात अडकलेल्या लोकांना ड्रोनच्या माध्यमातून खाणं आणि जेवण पोहोचवलं जात होतं.