ओमानचे सुलतान कुबूस यांनी त्यांच्या देशात शिक्षा भोगत असणाऱ्या १७ भारतीय कैद्यांची सुटका केली आहे. ईद सणाच्यानिमित्त कुबूस यांनी हा निर्णय घेतला असून या १७ कैद्यांना ‘शाही माफी’ देण्यात आली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. ‘ईद-उल-फितर त्या मुहूर्तावर ओमानचे माननीय सुलतान कुबूस यांनी दाखवलेल्या उदारपणाचे आम्हाला कौतुक आहे,’ असं ट्विट जयशंकर यांनी केले आहे.

ओमानमधील भारतीय दूतावासाच्या ट्विटर हॅण्डलवरुन सर्वात आधी या माफीची माहिती देण्यात आली. ‘ओमानमध्ये शिक्षा भोगत असणाऱ्या १७ भारतीयांना ईदच्या मुहूर्तावर शाही माफी देण्यात आली आहे. भारताच्या मित्र देशाने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,’ असे या ट्विटमध्ये म्हटले होते.

जगभरामध्ये मागील आठवड्यामध्ये ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ साली फेब्रुवारी महिन्यात ११ आणि १२ तारखेला ओमानचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी मस्कतमधील शिवमंदिराला भेट दिली होती. या दौऱ्यात त्यांनी सुलतान कुबूस यांची भेट घेतली होती. यावेळी या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, आरोग्य, पर्यटन क्षेत्रांसंबंधीचे आठ करारही झाले होते.