विनीत उपाध्याय
१५ रुपयांचं तिकीट कर्नाटकमधल्या एका प्रवाशासाठी आयुष्यभराचा अनुभव देऊन गेलं आहे. वर्षभरापूर्वी कर्नाटकमधल्या गुलिगेनहल्ली इथे एक प्रवासी बसमध्ये चढला. कंडक्टकडे त्याने सिरा इथे जाण्यासाठी तिकीट मागितलं. तिकीट १५ रुपये होतं. सुट्टे नसल्यामुळे त्याने ५०० रुपयांची नोट कंडक्टरला दिली. १५ रुपये घेऊन बाकीचे ४८५ रुपये परत देतो असं कंडक्टरने सांगितलं. प्रवास संपल्यानंतर दुसरी बस पकडण्याची घाई असल्यामुळे उरलेले पैसे न घेताच तो प्रवासी निघून गेला.
यानंतरचं दीड वर्ष खूप साऱ्या विनंत्या, कायदेशीर नोटीस आणि कर्नाटक सरकार परिवहन महामंडळाने हा प्रवासी खरंच बसमध्ये चढला होता का? अशा अनेक गोष्टी घडल्या. कर्नाटक ग्राहक आयोगाने प्रवाशाच्या बाजूने निकाल दिला आहे. आयोगाने कर्नाटक सरकार परिवहन महामंडळाला ११,४८५ रुपये देण्याचा आदेश दिला आहे.
द तुमकुरू जिल्हा ग्राहक निवारण आयोगाचे अध्यक्ष जी.टी. विजयालक्ष्मी तसंच सदस्य निवेदिता रवीश आणि कुमार एन यांनी ३२वर्षीय मंजुनाथ आर.टी यांची तक्रार ऐकून घेतली. कंडक्टर उर्वरित ४८५ रुपये देऊ शकला नव्हता. ४८५ रुपये व्याजासह मिळावेत तसंच झालेल्या मनस्तापासाठी एक लाख, २५००० आर्थित नुकसान म्हणून, ५०००० तक्रार दाखल करण्यासाठी आणि ३००१ रुपये कायदेशीर प्रक्रियेसाठीचे मिळावेत अशी मागणी मंजुनाथने केली.
प्रवासी हा कर्नाटक परिवहन महामंडळाचा ग्राहक आहे. त्याने १५ रुपयांच्या तिकिटासाठी ५०० रुपये दिले होते. कंडक्टरने प्रवाशाला ४८५ रुपये परत देणं अपेक्षित होतं. परिवहन महामंडळाने हे पैसे प्रवाशाला देणं परत दिलेले नाहीत. ही कामातली त्रूट आणि दिरंगाई आहे. महामंडळाने कामात चालढकल केल्यामुळे प्रवाशाला आयोगाकडे दाद मागावी लागली असं १२ ऑक्टोबर रोजी आयोगाने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
मंजुनाथ यांनी गेल्या वर्षी १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुलिगेनहल्ली ते सिरा हा प्रवास केला. त्यावेळी हा प्रकार घडला. कंडक्टरने तिकिटावर ४८५ रुपये परत देणं आहे असं लिहिलं. मंजुनाथ यांनी दाखल केलेल्या तक्रारीतील तपशीलानुसार, त्यांच्याकडे किंवा कंडक्टरकडे सुट्टे पैसे नव्हते. कंडक्टरने १५ रुपयांचं तिकीट दिलं. आणि उरलेले पैसे द्यायचे आहेत असं लिहून दिलं. बस सिरा इथे पोहोचली. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या तिकीट चेकरने तिकीटाचं विचारलं. प्रवाशाने चित्रदुर्गला जाणारी बस पकडायची असल्याने त्या गडबडीत असल्याचं सांगितलं. उरलेले पैसे घ्यायला विसरलो असं मंजुनाथ यांनी सांगितलं. १६ ऑगस्ट २०२५ रोजी मंजुनाथ यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाला उरलेले पैसे परत मिळावेत यासाठी पत्र लिहिलं. पत्राबरोबर त्यांनी तिकिटाची प्रत जोडली.
कर्नाटक परिवहन महामंडळाने मंजुनाथ यांचा तक्रारअर्ज मिळाल्याचं सांगितलं. १० सप्टेंबर २०१५ रोजी मंजुनाथ यांनी महामंडळाला कायदेशीर नोटीस बजावली. पण त्यांना उर्वरित पैसे मिळाले नाहीत.३० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी ग्राहक समस्या निवारण आयोगाकडे दाद मागितली.
कर्नाटक परिवहन मंडळाने तक्रार मिळाल्यानंतर वेगळीच भूमिका घेतली. मंजुनाथ यांनी त्यादिवशी बसने प्रवास केलाच नाही असं परिवहन महामंडळाने सांगितलं. तिकिटाच्या वैधतेविषयीही त्यांनी शंका व्यक्त केली. अंतर्गत पाहणीत कंडक्टरकडे ४५६ रुपये अतिरिक्त असल्याचं उघड झालं. कंडक्टरवर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचं परिवहन महामंडळाने सांगितलं. प्रवाशाने कंडक्टरला मदत व्हावी म्हणून खोटी तक्रार दिल्याचंही महामंडळाने सांगितलं.
१५ रुपयांचं तिकीट मंजुनाथ यांना दिलं. त्यांना उरलेले ४८५ रुपये देणं होतं हे कंडक्टरने मान्य केलं. त्याबाबत तिकिटावर लिहून दिलं हेही त्यांनी सांगितलं. पाहणीनंतर ४५६ रुपये डेपोत जमा केल्याचं कंडक्टरने सांगितलं.
तिकीट खोटं आहे किंवा अन्य कुणाचं तरी आहे हे परिवहन महामंडळाला सिद्ध करता आलेलं नाही. महामंडळाच्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्सनुसार हे तिकीट १२ ऑगस्ट २०२५ रोजीचंच आहे. परिवहन मंडळांचं अंतर्गत लेखापरीक्षण तसंच शिस्तभंगासाठी कारवाई यासाठी ग्राहकांच्या हक्काचा बळी देता येणार नाही असं आयोगाने सांगितलं.
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कामकाजात उणीव आढळल्याने आयोगाने मंजुनाथ यांच्या बाजूने निकाल दिला. आयोगाने कंडक्टरविरोधातील तक्रार निकाली काढली. पैसे परत देण्याची जबाबदारी कंडक्टरवर एकट्याने टाकून चालणार नाही असंही आयोगाने सांगितलं. कर्नाटक परिवहन महामंडळाने ४८५ रुपये ९ टक्के व्याजासह द्यावेत. ३० सप्टेंबर २०२५ पासूनचा कालावधी यासाठी ग्राह्य मानावा. ५,००० रुपये नुकसानभरपाई, ६००० रुपये कायदेशीर प्रक्रियेसाठीचा खर्च असे मिळून मंजुनाथ यांना ११,४८५ रुपये महामंडळाने द्यावेत असा आदेश आयोगाने दिला.
