RSS Begins ‘Dhwaj Yatra’ Kashmir to Kanyakumari: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आजपासून (०६ फेब्रुवारी) “काश्मीर ते कन्याकुमारी” ध्वज यात्रेला सुरुवात केली आहे. संघाच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकातून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे. “शतक: संघाची १०० वर्षे” या चित्रपटाचा संदेश देशभर पोहोचवणे आणि आरएसएसच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक योगदागाची माहिती देणे हा या यात्रेचा उद्देश आहे.
श्रीनगर ते जम्मू पायी प्रवास
श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातून या यात्रोचा शुभारंभ झाला. श्रीनगर ते जम्मू संघाच्या सदस्यांनी पायी प्रवास केला. यात स्थानिक नागरिकांनी देखील सहभाग घेतला. या चित्रपट निर्माते वीर कपूर देखील उपस्थित होते. यात्रेची सुरुवात एक मिनिट मौन पाळून करण्यात आली. यावेळी १९४७ साली काश्मीर आणि भारताच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न करताना बलिदान देणाऱ्या आरएसएस सदस्य आणि भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
“शतक: संघाची १०० वर्षे” चित्रपट
काश्मीर भौगोलिक, सांस्कृतिक आणि मानसिक दृष्टीने भारताचा अविभाज्य भाग आहे. “शतक: संघाची १०० वर्षे” या चित्रपटात संघाच्या शंभर वर्षाचे काम आणि योगदान यावर भाष्य करण्यात आले आहे. आशिष माल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, आशिष तिवारी यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. येत्या १९ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
यात्रेबाबत वीर कपूर काय म्हणाले?
“यात्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात आरएसएसबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांपर्यंत आरएसएसचा खरा इतिहास पोहोचवणे”, हा आमचा उद्देश आहे, असे चित्रपटाचे निर्माते वीर कपूर म्हणाले. संघाची शंभर वर्षे साजरी करणे आणि संघाचे काम लोकांपर्यंत पोहोचवणे हा चित्रपट केल्याचेही कपूर ‘द हिंदू’शी बोलताना म्हणाले.

