सरसंघचालक मोहन भागवत गुरुवारी ‘ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशन’चे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. या भेटीतून मुस्लिमांशी संवादप्रक्रिया कायम ठेवण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावेळी मोहन भागवतांनी मदरशामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

इमाम इलियासी यांनी मोहन भागवत यांनी भेटीचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर सरसंघचालक दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीमध्ये इमामांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. या भेटीनंतर इमाम इलियासी यांनी मोहन भागवत यांचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून उल्लेख केला.

‘‘सरसंघचालक राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या भेटीमुळे समाजामध्ये योग्य संदेश दिला गेला आहे. मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. आम्ही दोघेही देशाच्या हितालाच प्राधान्य देतो’’, असं इमाम इलियासी म्हणाले. त्यावर, मोहन भागवत यांनी देशाचे राष्ट्रपिता एकच असून, आपण सर्व भारताची लेकरे आहोत, असं स्पष्ट केलं.

मुस्लिमांशी संवाद कायम राखण्याचा संघाचा प्रयत्न ; सरसंघचालक मोहन भागवत-इमाम इलियासी भेट

मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचंही इमाम इलियासी यांनी सांगितलं. याबद्दल संघाचे इंद्रेश कुमार यांनी इंडिया टु़डेशी बोलताना सांगितलं की “मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकता? तसंच आयुष्यात कोण होण्याची इच्छा आहे? अशी विचारणा केली. यावर विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्याला डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं आहे असं सांगितलं”.

मोहन भागवत यांनी यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या देशाबद्दल अधिक जाणून घ्या असं सांगितलं. तसंच प्रार्थना करण्याची पद्दत वेगळी असली तरी प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे असंही म्हणाले.

मुस्लीम नेत्यांनी सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेतल्यानंतर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, म्हणाले, “हे सर्व…”

इमाम इलियासी यांनी यावेळी मोहन भागवत यांना येथे धार्मिक शिक्षणासोबतच मुलांना आधुनिक शिक्षणही दिलं जात असल्याची माहिती दिली. मोहन भागवत यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी यावेळी ‘जय हिंद’ अशा घोषणाही दिल्या.

मोहन भागवत यांनी विद्यार्थ्यांना इस्लामिक अभ्यासासोबत संगणक कौशल्यही आत्मसात करा, जेणेकरुन भविष्यात फायदा होईल असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी मुलांना भारतातील राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांबद्दल सामान्य ज्ञानाचे प्रश्नदेखील विचारले. काही मुलांनी कुराणचे संपूर्ण सादरीकरण केल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं. आधुनिक शिक्षण देखील मदरसा शिक्षणाचा भाग असायला हवे यावर आरएसएस प्रमुखांनी भर दिला.