RSS Chief Mohan Bhagwat on Sanskrit : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोमवारी संस्कृत भाषा शिकण्याच्या महत्त्वावर भर दिला. संस्कृतला भारताचा ‘खरा आत्मा’ आणि देशाच्या सांस्कृतिक सातत्याचा एक आवश्यक घटक असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ते दिल्लीतील ‘संस्कृत भारती’च्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ही संस्था संस्कृतला एक जिवंत आणि व्यापकपणे वापरली जाणारी भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे.

कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत म्हणाले, “संस्कृत ही केवळ एक भाषा नाही. भारतात संस्कृत राष्ट्राचा आत्मा आहे, कारण ती विचार, जीवन आणि संस्कृतीची सर्वात प्राचीन परंपरा आहे, जी आजही जिवंत आहे.” भारताच्या वैचारिक संकल्पनेवर भाष्य करताना ते म्हणाले, “भारताचे अस्तित्व केवळ भौगोलिक वास्तव नाही. ती केवळ राजकीय किंवा आर्थिक संस्था नाही. भारत ही एक जिवंत परंपरा आहे, ज्या पायावर जीवनाचे सातत्य अवलंबून आहे.”

भारतीयांना कर्तव्य पूर्ण करायचं असेल तर भारताला समजून घ्यावं लागेल, स्वतःला भारत व्हावं लागेल. भारताला समजून घ्यायचं असेल तर संस्कृतला समजून घेणं अनिवार्य आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

संस्कृत अवघड भाषा वाटायची

आपल्या बालपणातील आठवणी सांगताना भागवत म्हणाले, “माझ्या लहानपणी जेव्हा शाळेत संस्कृत शिकवले जायचे, तेव्हा ते कठीण वाटायचे. अभ्यासक्रमात ‘श्लोक’ पाठ करावे लागत, ज्यामुळे संस्कृत ही एक अवघड भाषा असल्याचा समज निर्माण झाला. मात्र, तेच श्लोक जेव्हा घरात नैसर्गिकरित्या ऐकायला मिळायचे, तेव्हा ते कधीच कठीण वाटले नाहीत.”

संवादातून भाषा टिकते

ते पुढे म्हणाले, “हीच समस्या आजही कायम आहे; विद्यार्थ्यांना संस्कृत ही कठीण भाषा वाटते. पण प्रश्न असा उरतो की ती इतकी कठीण का वाटते? वास्तविक, भाषा शिकण्याची सर्वात सोपी आणि प्रभावी पद्धत ही पाठ्यपुस्तके नसून संवाद आहे.” भाषा शिकणे हे वातावरणातून आणि नियमित वापरामुळे सोपे होते, यावर त्यांनी भर दिला.

सरसंघचालक पुढे म्हणाले, “मी जेव्हा भारतभर प्रवास करतो, तेव्हा मला विविध प्रादेशिक भाषांमधील विशिष्ट शब्द माहीत नसले तरी, त्यामागील भावना आणि अर्थ समजून घेणे मला शक्य होते. सतत ऐकल्याने आणि बोलल्याने भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात केली जाते. त्यामुळे भाषा शिकण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे ती भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये मिसळणे, त्यांचे ऐकणे आणि सतत बोलणे हीच आहे.”