Mohan Bhagwat on GenZ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी LGBTQ+ समुदायाबाबत त्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडली. या समुदायातील सदस्यांचे हक्क, अधिकार व समाजातील स्थान यावर सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते. मोहन भागवत यांनी याच मुद्द्यांच्या आधारे सध्याच्या परिस्थितीबाबत भाष्य केलं आहे. यावेळी मोहन भागवत यांनी आपल्या भाषणादरम्यान LGBTQ+ समुदायाबरोबरच जेनझींबद्दलदेखील सूचक शब्दांमध्ये वक्तव्य केलं आहे.
GenZ बाबत काय म्हणाले मोहन भागवत?
नुकतंच दिल्लीत CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात जेनझींचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या आंदोलनाचा परिणाम म्हणून अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर देशभरात जेनझींची चर्चा असताना मोहन भागवत यांनी त्याबाबत भाष्य केलं आहे. “जनझी चांगले असतात. अनुकरण करतात. भावनिक असतात. शांत डोक्याने विचार करत नाहीत. जे त्यांच्यासमोर आहेत, ते प्रामाणिक दिसत असतील, तर जेनझी लगेच प्रभावित होतात”, असं ते म्हणाले.
LGBTQ+ समुदायाबाबत मांडली स्पष्ट भूमिका
मोहन भागवत यांनी याच भाषणात बोलताना LGBTQ+ समुदायाच्या समाजातील स्थानाबाबतही भाष्य केलं. “सर्व समाजांत या प्रकारची माणसं असतात. काही तर निसर्गानंच दिलेले प्रकार आहेत. आपण त्यावर काही करू शकत नाही, ते सुद्धा यावर काही करू शकत नाहीत. ते तसेच जन्माला आले आहेत. काहीजण मानसिकतेमुळे नंतर तसे झाले. काही शारिरीक आकर्षणामुळे तसे घडले. पण तसं आहे तर आहे. सगळ्या जगात जर या प्रकारच्या व्यक्ती असतील तर आपल्याकडे नव्हत्या असं आपण म्हणू शकत नाही. आपणही मनुष्य आहोत. पण आपल्याकडे त्यांची बेमालूमपणे व्यवस्था करण्यात आली”, असं मोहन भागवत म्हणाले.
त्यांनाही जगण्याचा समान अधिकार – मोहन भागवत
“आपल्याकडे असं मानलं गेलं की या व्यक्ती आहेत. त्यातल्या ज्यांच्यावर उपचार शक्य आहेत, त्यांच्यावर उपचार होतात. पण ज्यांच्यावर उपचार शक्त नाहीत तेदेखील मनुष्य आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना समाजापासून वेगळं नाही करत. समाजात त्यांच्यासाठीही एक व्यवस्था आहे. त्यांच्याकडे हीन भावनेतून पाहू नका. शिखंडी एक राजा होता. तो सगळ्या वीरांच्या समवेत लढण्यासाठी रणांगणावर गेला होता. त्यामुळे आपल्याकडे याची एक व्यवस्था होती. आजही त्यांचे देवी-देवता आहेत, देवस्थान आहेत, महामंडलेश्वरही आहेत. कुंभमेळ्यात ते येतात”, असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.
“अशा गोष्टींवर विनाकारण आकांडतांडव न करता, आरडाओरड न करता शांतपणे त्यांची एक व्यवस्था व्हायला हवी. जेणेकरून समाजाची त्यांच्याबाबत सहानुभूती कायम राहावी. आपण हे केलं आहे. पण नव्या जगात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर उत्तर मात्र नाहीये”, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
