Mohan Bhagwat Statement on Pakistan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडताना संवादाचे दरवाजे कायम खुले ठेवण्याची भूमिका मांडली. भारत हा हिटलरसारखा हुकूमशाही देश नाही. अन्याय आणि जुलूमशाहीचा पराभव करणे हे आपले कर्तव्य असले तरी चांगल्या गोष्टीचे जतन करणे आणि संवादाचे दरवाजे उघडे ठेवणे ही आपली संस्कृती आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी पाकिस्तानबरोबरच्या संवादाबाबत केलेल्या विधानाचे समर्थन करताना त्यांनी ही भूमिका मांडली. ते केरळमधील थिरुवनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

दत्तात्रय होसबळे नेमके काय म्हणाले होते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी मे महिन्यात पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत पाकिस्तान दहशतवादाची पाठराखण करत असताना भारताने त्यांच्याशी कसे वर्तन ठेवावे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना होसबळे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा दाखला दिला होता. “पाकिस्तान जर पुलवामासारख्या घटनांच्या माध्यमातून भारताला किरकोळ जखमा देण्याचा प्रयत्न करत असेल, तर देशाची सुरक्षा आणि स्वाभिमान जपण्यासाठी परिस्थितीनुसार त्यांना ठोस उत्तर दिले गेले पाहिजे. सरकारने याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. मात्र, त्याचवेळी संवादाचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत. व्यापार आणि वाणिज्य व्हिसा देणे थांबता कामा नये, कारण संवादासाठी नेहमी एक मार्ग खुला ठेवला पाहिजे,” असे मत होसबळे यांनी व्यक्त केले होते. पाकिस्तानमधील नागरी समाज, विविध संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यातील संपर्क वाढत राहिल्यास दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यास मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले होते.

“पाकिस्तानचा पूर्ण पराभव करायचा असेल, तर…”

दत्तात्रेय होसबळे यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी पाकिस्तानातील काही लोकांच्या विचारांचा दाखला दिला. “पाकिस्तानात असे अनेक लोक आहेत ज्यांना भारताची फाळणी चुकीची होती असे आजही वाटते. तेथील अनेक पत्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचीही प्रशंसा करतात. पाकिस्तानमध्ये अंतर्गत पातळीवर एक असा वर्ग आहे, जो पाकिस्तान निर्मितीच्या आणि द्विराष्ट्र सिद्धांताच्या विरोधात आहे. एकत्र राहणेच अधिक चांगले होते, असे या लोकांचे मत असल्याचे मोहन भागवत म्हणाले. भविष्यात भारताला पाकिस्तानचा संपूर्ण पराभव करायचा असेल, तर तेथील लोकांना एकतर भारतात सामील करून घ्यावे लागेल, अथवा त्याच देशात शांततेने राहण्यायोग्य बनवावे लागेल आणि यासाठी संवादाचे दरवाजे खुले ठेवावे लागतील, असेही त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानबाबत संघाची नेमकी भूमिका काय?

भारत हा हिटलरसारखा हुकूमशाही देश नाही. तसा आमचा स्वभाव आणि कार्यपद्धतीही नाही. त्यामुळे आपण कोणताही एक मार्ग खुला ठेवून अन्याय अत्याचाराचा पराभव करायला हवा. मात्र, परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोणतेही स्वतंत्र धोरण नाही आणि संघ या विषयात केंद्र सरकारच्या भूमिकेसोबत खंबीरपणे उभा आहे, असेही सरसंघचालकांनी स्पष्ट केले. मोहन भागवत यांच्या या विधानामुळे भारत-पाकिस्तान संबंध, फाळणीचा इतिहास आणि संवादाच्या राजकारणावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान संबंधांच्या विविध टप्प्यांमध्ये संघाने एका बाजूला दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतली, तर दुसऱ्या बाजूला संवाद आणि जनसंपर्कावरही भर दिला आहे. अनेकदा संघाने दहशतवादी हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर देण्याची मागणी करतानाच दोन्ही देशांतील नागरिकांमधील संपर्क वाढवण्याचे समर्थन केले आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंधूर’ या लष्करी कारवाईच्या काही महिन्यांनंतर, सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या शेजारी देशांना आपल्या कुटुंबाचाच भाग असे संबोधले होते. शेजारील देशांची समृद्धी ही भारताच्याच हिताची असून नवी दिल्लीने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे ते म्हणाले होते.

पुलवामा हल्ल्यानंतर अत्यंत कठोर भूमिका

भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंधूर’ या लष्करी कारवाईचेही मोहन भागवत यांनी समर्थन केले होते. या कारवाईमुळे देशाचा स्वाभिमान वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले होते. २०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अत्यंत कडक भूमिका घेतली होती. हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. या घटनेला ठोस उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षा आहे. आपण खूप सहन केले आहे आणि आजची घटना त्याचेच उदाहरण आहे. त्यांना (पाकिस्तानला) योग्य प्रत्युत्तर मिळेल, असे संघाने म्हटले होते. या आक्रमक भूमिकेच्या आधी पाकिस्तानबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अनेकदा तुलनेने मवाळ आणि संवादाला प्रोत्साहन देणारी राहिली होती. जानेवारी २०१६ मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला, अगदी त्याच दिवशी संघाने पाकिस्तानसोबतच्या सलोख्याच्या संबंधांवर भर दिला होता. तसेच, त्याआधी काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातीच्या विवाहासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक लाहोरला दिलेल्या भेटीचेही संघाने समर्थन केले होते.