राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कुणाशीही दुजाभाव न करता नेहमी देशहिताचे कार्य केले असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुरगाणा तालुक्यातील प्रतापगड येथे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना केले. मुंबई येथील संघाच्या कार्यालयात आचारी म्हणून सेवाकार्य करणाऱ्या देविदास कामडी या स्वयंसेवकाच्या विवाह सोहळ्यास खास उपस्थित राहण्यासाठी सरसंघचालक तालुक्यात आले होते. अतिशय दुर्गम भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा सोहळा पार पडला.
प्रतापगड येथील संघाचे कार्यवाहक ललित चव्हाण यांच्या शेतातील निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात निवडक स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन देशाला एकजूट ठेवण्यासाठी संघ नेहमी देशहिताचे कार्य करीत असल्याचे भागवत यांनी नमूद केले. मोठी घोडी येथील कामडी हा स्वयंसेवक मुंबईच्या संघ कार्यालयात आचारी म्हणून सेवाकार्य करीत आहे. त्याच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी खास सरसंघचालक नाशिक दौऱ्यावर आले. तोरणडोंगरी येथे त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी सरसंघचालकांनी विवाह म्हणजे दोन कुटुंबांचे मनोमीलन असल्याचे सांगून त्यात समाजाचेही प्रतिबिंब उमटत असते, याकडे लक्ष वेधले.
सरसंघचालक उपस्थित राहणार असल्याने विवाहस्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. मंडपद्वारावर धातूशोधक यंत्रातून तपासणी झाल्यावर प्रत्येकास आत प्रवेश मिळाला.