RSS Chief Mohan Bhagwat UK Visit : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ब्रिटन दौऱ्याचे तेथील १०० हून अधिक हिंदू संघटनांनी स्वागत केले आहे. आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय संपर्क मोहिमेअंतर्गत भागवत सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि कॅनडानंतर त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा ब्रिटनमध्ये सुरू झाला आहे. याबद्दल सविस्तर वृत्त पीटीआयने दिले आहे.
१०० हून अधिक संघटनांचे संयुक्त निवेदन
भागवत ब्रिटनमध्ये दाखल झाल्यानंतर हिंदू कौन्सिल यूके, हिंदू फोरम ऑफ ब्रिटन, हिंदू स्वयंसेवक संघ यूके आणि इनसाईट यूके यांसह १०० हून अधिक संघटनांनी एकत्रित निवेदन जारी केले. या संघटनांनी आरएसएसला जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संस्थांपैकी एक असल्याचे सांगत सामाजिक ऐक्य, नेतृत्वगुण, स्वयंसेवा, व्यक्तिमत्त्व विकास आणि जागतिक बंधुभावासाठी संघटना काम करत असल्याचे म्हटले.
आरएसएसच्या ‘पाच परिवर्तनां’चे समर्थन
डॉ. मोहन भागवत यांच्या नेतृत्वाखाली आरएसएसमध्ये मांडण्यात आलेल्या पाच परिवर्तनांचे ब्रिटनमधील संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य, कुटुंबाचे महत्त्व, निःस्वार्थ सेवा, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक म्हणून कर्तव्यांचे प्रामाणिक पालन या मुद्द्यांचा समावेश आहे.
ब्रिटिश सरकारने व्हिसावर काय सांगितले?
भागवत यांच्या ब्रिटन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्हिसाबाबत ब्रिटिश संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. ब्रिटिश-भारतीय मंत्री नादिया व्हिटोम यांनी ब्रिटनच्या गृह मंत्रालयाला प्रश्न विचारत भागवत यांच्या दौऱ्याचे सरकारने पूर्णपणे परीक्षण केले आहे का? अशी विचारणा केली होती. द्वेष पसरवणारी भाषणे करणाऱ्या किंवा कट्टरतावादी विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना ब्रिटनमध्ये प्रवेश न देण्याच्या सरकारच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा तपासण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावर ब्रिटनचे सुरक्षा मंत्री डॅन जार्विस यांनी संसदेत उत्तर देताना सरकार व्यक्तिगत प्रकरणांवर भाष्य करू शकत नाही, असे स्पष्ट केले. मात्र, हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या विचारांचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींसह विविध प्रकारच्या धोक्यांना सरकार गांभीर्याने हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने देशाच्या इमिग्रेशन नियमांमधील आवश्यक अटी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दौऱ्याला विरोधही
भागवत यांच्या ब्रिटन दौऱ्यावर सर्वच संघटनांनी समर्थन दर्शवलेले नाही. दक्षिण आशिया एकता गट आणि हिंदू फॉर ह्युमन राइट्स यूके यांसारख्या काही नागरी संस्थांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सरकारने आरएसएस प्रमुखांच्या दौऱ्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी करण्यात आली होती.
