Mohan Bhagwat New York ISKCON Visit : आरएसएस प्रमुख मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडम या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. सध्या ते अमेरिकेत असून आज आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, २९ ऑगस्ट रोजी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी शुक्रवारी त्यांनी न्यूयॉर्कमधील इस्कॉन मंदिराला भेट दिली आणि बेघर लोकांसाठीच्या अन्न वितरण उपक्रमात सहभाग घेतला.

१९६६ मध्ये श्रील प्रभूपाद यांनी ज्या ठिकाणी इस्कॉनची स्थापना केली होती, त्या ‘२६ सेकंड एव्हेन्यू’ येथील मंदिराला भेट दिली असता, भागवत यांनी श्रील प्रभूपाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि ‘झिरो हंगर न्यूयॉर्क’ उपक्रमांतर्गत १ लाख भोजनाच्या वितरणाचे उद्घाटन केले, अशी माहिती इस्कॉन गव्हर्निंग बॉडीचे कमिशनर गौरांग दास यांनी ‘एक्स’ वरील एका पोस्टद्वारे दिली.

‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना गौरांग दास म्हणाले की, भागवत यांची ही भेट ऐतिहासिक असून यामुळे या संस्थेच्या जागतिक विस्तारावर प्रकाश पडतो. सध्या १२० देशांमध्ये इस्कॉनची सुमारे १ हजार ३०० मंदिरे आहेत आणि त्यांनी हिंदू सनातन धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे श्रेय श्रील प्रभूपाद यांना दिले. गौरांग दास यांनी सांगितलं की, भागवत यांनी जागतिक शांतता आणि सौहार्द वाढवण्यासाठी आरएसएस आणि इस्कॉन एकत्र येऊन कशा प्रकारे काम करू शकतात, यावर चर्चा केली.

जगाला एकत्र आणणारी कृष्णभावना

भागवत यांनी एक संदेश देखील लिहिला, ज्यामध्ये त्यांनी इस्कॉनचा उल्लेख जगाला “श्रीकृष्ण भावनेची” भेट देणारे एक “प्रेरणादायी ठिकाण” असा केला. त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितलं की ते “शुद्ध सात्त्विक प्रेमाच्या” भावनेने भारावून गेले आहेत. मंदिरातील भाविकांना संबोधित करताना भागवत म्हणाले, “आजच्या जगात अनेक संघर्ष आणि दुजाभाव आहेत. एकत्र आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चेतना आहे. ती चेतना म्हणजेच कृष्ण भावना होय.”

… तर बनेल स्वर्गीय निवासस्थान

ते पुढे म्हणाले, “आपण सर्व एक आहोत आणि या जगातील दुजाभावाच्या काळातही आपण या दृढ समजुतीसह जगत आलो आहोत की जरी अनेक विविधता, द्वैत आणि संघर्ष असले, तरी प्रत्यक्षात हे सर्व काही कृष्णच आहे. सर्व काही कृष्णच आहे. जर हा विचार प्रत्येक हृदयात पोहोचला, तर हे जग नक्कीच एक उत्तम जग बनेल; ते आज आपण पाहत असलेले भौतिक जग राहणार नाही, तर प्रत्येक मानवासाठी ते एक स्वर्गीय निवासस्थान बनेल.”

इस्कॉनच्या गव्हर्निंग बॉडीचे कमिशनर अनुत्तम दास यांनी आरएसएस प्रमुखांच्या या भेटीचे स्वागत केले. ते म्हणाले की, वाढता संघर्ष आणि ध्रुवीकरणाच्या या काळात संस्था जगभरात ईश्वर भावनेची आणि कृष्ण भावनेची मूल्ये रुजवण्यासाठी मार्ग शोधत आहे. आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, २९ ऑगस्ट रोजी मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ मध्ये भागवत भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. आरएसएस प्रमुख मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले असून, हा त्यांचा अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडम (यूके) या तीन देशांचा जनसंपर्क दौरा आहे.