तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा  Dalai Lama यांना भारतरत्न Bharat Ratna द्यावे यासाठी कोणतीही मोहीम सुरू करण्यात आलेली नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले आहे. दलाई लामांना भारतरत्न द्यावे की नाही याचा निर्णय केंद्र सरकारच घेणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली आहे.

दलाई लामा यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  RSS ६ एप्रिलपासून मोहीम सुरु केल्याचे अरुणाचल प्रदेशमधील संघाचे नेते चोसांग यांनी जाहीर केले होते. दलाई लामा हे देशाचे सुपूत्र असून त्यांचा भारतरत्नने सन्मान झाल्यास आनंदच होईल असे ते म्हणाले होते. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे विधान केले होते. दलाई लामांना भारतरत्न दिल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य संदेश जाईल असेही त्यांनी म्हटले होते. आम्ही यासाठी सह्यांची मोहीम सुरु केली असून आत्तापर्यंत पाच हजार जणांनी यावर स्वाक्षरी केली आहे. २५ हजार स्वाक्षरी झाल्यावर आम्ही हे पत्रक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवू असेही चोसांग यांनी स्पष्ट केले होते.

चोसांग यांच्या या विधानावर सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही दलाई लामा यांना भारतरत्न द्यावे यासाठी कोणतीही मोहीम सुरु केलेली नाही. हे निर्णय केंद्र सरकारच्याच अखत्यारित येतात असे संघाचे प्रवक्ते राजीव तुली यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केला होता. लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीबाबत चीनने भारताकडे निषेध नोंदविला होता. दलाई लामा यांना वादग्रस्त परिसरात भेट देण्याची अनुमती देऊन भारत तणावाला खतपाणी घालत असल्याचा आरोपही चीनने केला होता. केंद्रीय मंत्री किरेन रिजीजूही दलाई लामांसोबत आल्याने चीन आक्रमक झाला होता. दलाई लामा यांना भारत रत्न देण्याची मागणी होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी भाजप खासदार शांता कुमार यांनीदेखील दलाई लामांना भारत रत्न देण्याची मागणी केली होती.