राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी सनातन धर्मावरुन उदयनिधी स्टॅलिन यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. उदयनिधी स्टॅलिन हे तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी तमिळनाडूच्या विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासमोरच सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.
उदयनिधी स्टॅलिन नेमकं काय म्हणाले?
“लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या सनातन धर्माचे निर्मूलन झाले पाहिजे” असं विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलं. अशा प्रकारे विधान करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी काही गोष्टींना केवळ विरोध करून चालत नाही, तर त्या नष्टच केल्या पाहिजेत. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाला केवळ विरोध करू शकत नाही, तर आपल्याला त्यांचे निर्मूलन करावे लागेल; त्याचप्रमाणे आपल्याला सनातनचे निर्मूलन करायचे आहे असं वक्तव्य केलं होतं. आता त्यांच्या नव्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता दत्तात्रय होसबळेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

दत्तात्रय होसबळे यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याबबत काय म्हटलंय?
सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाले ते त्यांचं मत झालं शिवाय त्यांचं जे काही मत आहे त्यावर लोकांनी निवडणुकीत उत्तर दिलं आहे. कुणी काहीही म्हटलं तरीही सनातन धर्म संपणार नाही. सनातन ही अशी गोष्ट आहे जी शाश्वत आहे. हिंदू धर्मातली ही शाश्वतता म्हणजेच सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे एक एखाद्या वटवृक्षाप्रमाणे आहे. १०० वर्षे होऊद्या किंवा २०० वर्षे होऊ द्या वटवृक्ष तसाच उभा असतो. तसंच सनातन धर्माचं स्वरुप आहे. सनातन नावाचा हा वृक्ष जुना असू शकतो, कारण याची मूळं जुनीच आहेत. पण प्रत्येक मोसमात या वृक्षावर नवी फुलं आणि पानं उगवातत. त्यामुळे तो वृक्ष पुन्हा ताजा-तवाना होतो. सनातनचा अर्थ हाच आहे. हा प्राचीन धर्म आहे आणि अद्भुत संयोजनही आहे. सनातन धर्म ही आपली सभ्यता आहे. असंही होसबळे यांनी म्हटलं आहे.
प्रकाश नको, सावली नको असं वाटून काय उपयोग?
मला वाटतं की प्रकाश असायला नको, मला वाटतं की सावली नको असं वाटून या गोष्टी नाहिशा होणार नाहीत. सनातन धर्म हा आपल्या देशाचा आत्मा आहे. सनातन ही काही धार्मिक प्रथा किंवा परंपरा नाही. सनातन हे देशाचं मूल्य आहे. त्यामुळे कुणी काही म्हटल्याने सनातनचं अवमूल्यन वगैरे होणार नाही.
सनातन धर्माबाबत त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल-होसबळे
दत्तात्रय होसबळे यांनी पीटीआय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आपल्या देशाची सभ्यता हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. सध्या एआयचा जमाना आहे. तंत्रज्ञान प्रगत झालं आहे, ही आधुनिकता आपण स्वीकारतोच आहोत. सगळेच जण हे करतात. आता जे काही गृहस्थ सनातन धर्माबाबत बोलले आहेत. त्यांचा विचार कदाचित वेगळा असेल. सनातन धर्म प्रत्येकाचा आहे. त्यांचा विचार वेगळा असू शकतो. असं होसबळे यांनी म्हटलं आहे.
हिंदू राष्ट्र याबाबत होसबळे यांनी काय भूमिका मांडली?
हिंदू राष्ट्र हा उल्लेख धार्मिक नाही आणि अल्पसंख्याकाना हा विश्वास कसा दिला जाईल की ते भारतात सुरक्षित आहेत? हा प्रश्न विचारला असता होसबळे म्हणाले, “भारतात मुस्लिमांना दुय्यम वागणूक मिळते का? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत असं आहे का? तर तसं मुळीच नाही. शिवाय आम्ही अल्पसंख्याक समुदायाच्या नेत्यांसह सातत्याने चर्चा करत असतो. धर्म बदलला म्हणजे राष्ट्रीयत्व बदलत नाही. जर आपल्या देशाची राष्ट्रीयता एक आहे तर आम्ही कुणालाही वेगळं समजत नाही. आम्ही कुठलंही हिंदू राष्ट्र निर्माण करत नाही. तर भारत हा देश हिंदू राष्ट्रच आहे. जेव्हा आपल्या देशात ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हाही हे हिंदू राष्ट्रच होतं.” असं उत्तर होसबळेंनी दिलं आहे.
कोण आहेत दत्तात्रय होसबळे?
दत्तात्रय होसबळे यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेद्वारे त्यांनी राजकीय जीवनास सुरुवात केली. ते अभाविपमध्ये सक्रिय होते. तसंच अभाविपचे दोन दशक संघटन महामंत्री होते. दत्तात्रय होसबळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना पटण्याहून लखनऊला बोलावण्यात आले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०१५ मध्येच होसबळे यांच्याकडे सरकार्यवाहपदाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला. संघातील एका गटाने त्यांच्या नावाला विरोध केला होता. २०२१ पासून दत्तात्रय होसबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह होते. नंतर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सरचिटणीस हे पद देण्यात आलं.
