RSS Dattatreya Hosabale addressing Caste Discrimination Hindu Society: “जातीआधारित भेदभाव आणि अस्पृश्यता हा हिंदू समाजावरील कलंक आहे. हा भेदभाव कायदे किंवा प्रवचनांनी संपवता येणार नाही, तर त्यासाठी वैयक्तिक वर्तनात बदल करणे आवश्यक आहे”, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रय होसबळे यांनी केले आहे. भोपाळमधील लाल परडे मैदानावर संघाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना होसबळे पुढे म्हणाले की, भारताचा उदय हा इतर देशांवर वर्चस्व गाजविण्यापेक्षा मानवजातीच्या उत्कर्षासाठी झाला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताची मान उंचावली आहे, असे सांगून मदत कार्य आणि पर्यावरण रक्षणात संघाच्या कार्यकर्त्यांनी व्यापक सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेचा शेवट व्हायला हवा आणि याची सुरुवात दैनंदिन व्यवहारातून व्हायला व्हावी. माणसा-माणसांत कोणताही भेदभाव व्हायला नको. जातीआधारित भेदभाव हा हिंदू संस्कृतीचा भाग नाही, असेही दत्तात्रय होसबळे म्हणाले.
होसबळे यांनी रामायणाचा संदर्भ देताना म्हटले की, प्रभू रामानेही शबरीने दिलेली बोरे स्वीकारली होती. मग लोक कोणत्या आधारावर जातीच्या नावावर भेदभाव करत आहेत. जातीच्या नावावर होणारा कोणताही व्यवहार समाजाला कमकुवत करणारा असतो. लोकांनी बदलाची सुरुवात स्वतःच्या वर्तनातून आणि त्यांच्या घरापासून करायला हवी.
भारताच्या ५००० वर्षांच्या इतिहासाचा दाखला देताना होसबळे म्हणाले की, आजवर अनेक संकट आणि संघर्ष झेलून भारत पुन्हा पुन्हा उभा राहिला आहे. भारतीय लोक आणि शास्त्रज्ञांनी विविध क्षेत्रात देशाचे नाव जागतिक पातळीवर उजळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही भारताचे नाव उंचावण्यात कार्यरत आहेत.
भारताची प्रगती ही आर्थिक आणि भौतिक विकासावर मोजता येणार नाही. तर मानवतेबाबत भारताने दिलेले योगदानही पाहावे लागेल. भारताचा विकास वेगाने होत असून भारताची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. भारताच्या प्रगतीमुळे मानवतेला अनेक लाभ मिळत आहेत, असेही होसबळे म्हणाले.
होसबळे पुढे म्हणाले, भारताने कोणावरही वर्चस्व गाजविण्यासाठी किंवा कुणाचे शोषण करण्यासाठी प्रगती न करता मानवतेसाठी कल्याणासाठी विकास करायला हवा. भौतिक विकास आणि आध्यात्मिक आनंद याची उत्तम सांगड घालत संतुलित विकास कसा साधता यावा, हे भारताच्या विकासातून दिसून येत आहे.
मोहन भागवत काय म्हणाले?
तीन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका परिषदेला संबोधित केले होते. ज्यात त्यांनी म्हटले की, एखाद्या व्यक्तीच्या अहंकारामुळे गैरसमज निर्माण होतात. प्रत्येक गोष्ट त्याच्या नियंत्रणाखाली होत असून तोच प्रत्येक गोष्ट हाताळू शकतो, असा समज निर्माण होतो. हे सांगताना भागवत यांनी सूर्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले, “सूर्याचे उदाहरण पाहा. त्याच्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला यावर विश्वास नसेल तर हरकत नाही. तरीही सूर्योदय आणि सूर्यास्त होईल.
