राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी सध्या देशभरात सुरु असलेल्या #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याची फेसबुक पोस्ट आपल्या टि्वटर अकाऊंटवर शेअर करुन दत्तात्रय होसबळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला जे वाटत होते ते त्यांनी योग्य पद्धतीने मांडले. मला ही पोस्ट आवडली असे होसबळे यांनी टि्वटरवर ती पोस्ट शेअर करताना म्हटले आहे.

महिला पत्रकारांचे समर्थन करण्यासाठी तुम्हाला #MeToo मोहिमेची गरज नाही. तुम्हाला महिला असण्याचीही गरज नाही. काय योग्य आणि काय अयोग्य हे ओळखण्याची संवेदनशीलता तुमच्यामध्ये असली पाहिजे असे फेसबुकच्या महिला अधिकाऱ्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

भाजपा नेते आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यावर गंभीर आरोप होत असताना दत्तात्रय होसबळे यांनी ही पोस्ट टाकून #MeToo मोहिमेचे समर्थन केले आहे. आतापर्यंत सात महिला पत्रकारांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. अकबर वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. अकबर सध्या नाजयेरिया दौऱ्यावर असून अजूनपर्यंत त्यांनी या आरोपांवर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.