RSS Leader TG Mohandas Arrested: उजव्या विचारसरणीचे खंदे समर्थक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या टीजी मोहनदास यांना केरळ पोलिसांनी अटक केली आहे. जंतर-मंतर येथे आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत त्यांनी केलेले विधान वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. ‘पत्रिका’ नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर त्यांनी नीट पेपरफुटी आंदोलनावर भाष्य केले होते. यानंतर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. सार्वजनिक शांतता भंग करणे आणि लोकांमध्ये भीती, दहशत निर्माण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कारवाईवर भाजपाची टीका

पोलिसांच्या कारवाईवर भाजपाने टीका केली आहे. ही कारवाई भेदभावपूर्ण आहे. तसेच केरळमध्ये पूर आलेला असून सरकार बचाव आणि मदत कार्य करण्यात अपयशी ठरले आहे. त्यावरून लक्ष वळविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप भाजपाने केला.

तिरुवअनंतपुरम सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. रविवारी सायबर पोलिसांचे पथक मोहनदास यांच्या मट्टनचेरी जवळील कुवाप्पडम येथील घरी पोहोचले. यावेळी स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारीही त्यांच्यासमवेत होते. पोलिसांनी मोहनदास यांच्या यूट्यूब चॅनेलशी निगडित माहिती गोळा केली. तसेच व्हिडीओ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली डिजिटल उपकरणे घरातून ताब्यात घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनदास यांची या प्रकरणात सविस्तर चौकशी केली जाणार आहे. सायंकाळी ७.४५ वाजता मोहनदास यांना घरातून बाहेर काढून रुग्णालयात चाचणी करण्यासाठी नेण्यात आले, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

सरकारी रुग्णालयात चाचणी पूर्ण झाल्यानंतर मोहनदास यांना तिरुवअनंतपुरम येथे नेण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काय म्हटले?

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोहनदास यांच्यापासून अंतर राखले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी के. बी. श्रीकुमार यांनी एक निवेदन जाहीर केले असून त्यात म्हटले की, मोहनदास हे संघाचे पदाधिकारी नाहीत. “टीजी मोहनदास यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया हे त्यांचे वैयक्तिक मत होते. ते संघाचे कुठेही पदाधिकारी किंवा सदस्य नाहीत. संघाला त्यांचे विधान मान्य नाही आणि आम्ही त्याचा निषेध करतो”, अशी प्रतिक्रिया के. बी. श्रीकुमार यांनी दिली आहे.

TG Mohandas Controversial Remark
“तीन वेळा सूचना करुन गोळीबार केला असता”, हिंदुत्ववादी नेत्याचे दिल्ली आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य; महिलांवरही खालच्या पातळीवर टीका

मोहनदास काय म्हणाले होते?

‘पत्रिका’ या यूट्यूब चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडीओत मोहनदास म्हणाले होते, जर त्यांना जंतर-मंतरवरील आंदोलन हाताळण्याची किंवा नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मिळाली असती तर त्यांनी प्रथम तिथे कर्फ्यू लावला असता. “जंतर-मंतरवरील जमावाला पांगण्याचे आदेश दिले असते. तीन वेळा जाहीर सूचना देऊनही गर्दी पांगली नसती तर थेट गोळीबार केला असता. मग लोक सैरावैरा धावू लागले असते. त्यात काही जणांचा मृत्यू झाला असता, तर काही जण जखमी झाले असते. चार तासांत परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली असती. त्यानंतर मृतदेह गोळा करून रुग्णालयात पाठवून दिले असते”, असे विधान मोहनदास यांनी केले होते.

आणखी एका व्हिडीओमध्ये मोहनदास म्हणाले, “या भागातून पोलिसांचा बंदोबस्त काढून टाकायला हवा. मग तिथे खून आणि बलात्कार होऊ द्यावेत. बलात्काराची तक्रार दाखलही होणार नाही. कारण त्या महिलांना बलात्कार करून घ्यायला आवडतात.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ आणि २५ जुलै रोजी हे व्हिडीओ शेअर करण्यात आले होते. यामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला. तसेच लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होण्याची भीती होती.