भारतात मोठ्या संख्येने असलेल्या दलित समाजाच्या हाती त्यावेळी शस्त्रे दिली असती, तर आपल्या देशावर परकीयांचे आक्रमण झालेच नसते, आपण परकीय शक्तींना देशात घुसूच दिले नसते, असे मत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केले होते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’ने म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑर्गनायझर’च्या ताज्या अंकात बाबासाहेबांवर प्रदीर्घ लेख छापण्यात आला आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी केलेल्या योगदानाचा आढावा घेण्यात आला आहे. आंबेडकरांनी दलित समाजासह देशाच्या लोकशाही, राष्ट्रवाद, अर्थकारणाला नवी दिशा दिली होती, असे लेखात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच देशात परकीयांच्या घुसखोरीबाबत बाबासाहेबांचे मत काय होते, याचाही उल्लेख लेखात करण्यात आला आहे. देशातील दलित समाजाच्या हाती त्यावेळी शस्त्रे दिली गेली नाहीत. ती जर दिली गेली असती तर मुघल आणि परकीय शक्ती देशात घुसू शकलीच नसती, असे आंबेडकर यांना वाटत होते, असे लेखात म्हटले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने दलितांना जवळ करण्याचे घाणेरडे राजकारण सध्या देशात सुरू असल्याचा घणाघात देखील यात करण्यात आला आहे.