नवी दिल्ली : देशातील २८ माहिती आयोगांकडे तब्बल तीन लाख ८५ हजार अपिलाची प्रकरण प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. यातील नऊ आयोगांनी जुलै २०२५ ते जून २०२६ या कालावधीत ३७ हजार ७०१ प्रकरणं कोणताही निकाल न देताच माहिती अधिकाऱ्यांकडे परत पाठवली असून यामध्ये केंद्रीय आयोगाची १४ हजार ६०३ आणि महाराष्ट्र राज्य आयोगाच्या १४ हजार १४० प्रकरणांचा समावेश आहे. ‘सतर्क नागरिक संघटन’ या स्वयंसेवी संस्थेने एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे.
१२ ऑक्टोबरला माहिती अधिकार कायद्याला २१ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचे औचित्य साधून संस्थेने देशभरातील विविध आयोगांकडून माहिती मागवून त्यावर आधारित एक अहवाल तयार केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाकडे एका वर्षात ३१ हजार १७९ अर्ज दाखल झाले होते. त्यातील १४ हजार ६०३ परत पाठवण्यात आली होती. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार केंद्रीय आयोगाने परत पाठवलेली ९५ टक्के प्रकरणांची पुन्हा नोंद झालेली नाही. बिहार आणि गुजरात राज्यात ही संख्या अनुक्रमे ४४१७ आणि ३२७६ एवढी होती.
केंद्रीय माहिती आयोगात सध्या मुख्य माहिती आयुक्तांसह एकूण ११ आयुक्त कार्यरत आहेत, तरीही जानेवारी १ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत प्रलंबित प्रकरणांची संख्या नऊ हजार ३७८ ने वाढली आहे. ही परिस्थिती चिंताजनक आहे. आयोगाने प्रकरणांना होणारा विलंब दूर करण्यासाठी पावलं उचलायला हवी, असे सांगतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते कमोडोर लोकेश बत्रा (निवृत्त) यांनी या धोरणामुळे ‘पारदर्शक व्यवस्थेचे संरक्षक’ हे आता ‘अस्पष्ट व्यवस्थेचे संरक्षक’ झाल्याची टीका केली.
प्रकरणे निकाली काढण्याची कूर्मगती
देशातील १४ आयोगांना त्यांच्याकडील अपिलाची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. मात्र त्रिपुरात हा प्रतीक्षा कालावधी १९ वर्षं आठ महिने, मध्यप्रदेशात १९ वर्षे दोन महिने आणि छत्तीसगडमध्ये १८ वर्ष नोंदवण्यात आल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
विहित नमुन्यांतील अर्ज न भरल्यास आयोग ते अर्ज परत पाठवतात. पानाचा अनुक्रमांक गहाळ असणे यांसारख्या क्षुल्लक कारणांवरून हा निर्णय घेतला जातो. आयोगाने माहिती देण्यासाठी अनावश्यक प्रशासकीय अडथळे निर्माण करू नये. – अंजली भारद्वाज, संस्थापक, ‘सतर्क नागरिक संघटन’
