गेल्या साधारण वर्षभरापासून ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थ नियंत्रण विभाग अर्थात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो (NCB) चांगलाच चर्चेत आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आर्यन खान, मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरण NCB च्या कारवाईचं देशभरातून कौतुक झालं मात्र त्याबरोबर टीकाही झाली. अशातच आता NCB माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत यावं अशी मागणी केली जात आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही मागणी केली आहे. त्यांनी NCBच्या गेल्या वर्षभरातल्या कारवायांबद्दलचा तपशील तसंच मिळालेल्या ड्रग्जची विल्हेवाट कशी लावली जाते, यासंदर्भातली माहिती मिळावी अशी मागणी केली होती. मात्र NCBने ती माहिती देण्यास नकार दिला. त्यासंदर्भात गलगली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे NCB ला माहिती देण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे.

गलगली म्हणाले, “देशभरात वर्षभरात ड्रग्जप्रकरणी जी कारवाई झाली, त्याची माहिती आम्ही NCB कडून मागवली होती. NCB ने आम्हाला माहिती द्यायला नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की NCB माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही. मात्र मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईची माहिती दिली होती. ज्या प्रकारे एनसीबी माध्यमांसमोर आरोपीची माहिती देते मग माहिती अधिकाराअंतर्गत का माहिती देत नाही? देशाच्या नागरिकांना कारवाई कशी होते आणि ड्रग्ज कसे नष्ट केले जातात याबाबतची माहिती मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. यासंदर्भात आम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे की मुंबई पोलिसांप्रमाणेच NCB लाही माहिती सार्वजनिक करण्याचे निर्देश द्यावेत. जी कारवाई होते त्याची माहिती वेबसाईटवर देण्याचे निर्देश द्यावेत”.