माहिती अधिकारांतर्गत येणाऱ्या सर्व तरतुदींची पूर्तता न केल्याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेऊन केंद्रीय माहिती आयोगाच्या पूर्ण पीठाने या पक्षांविरोधात आज, (शुक्रवारी) सुनावणी मुक्रर केली आहे. काँग्रेस, भाजप, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पार्टी या पक्षांविरोधात सुनावणी घेण्यात येईल.
हे सर्व राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदींखाली लोकांना जबाबदार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या वैधानिक तरतुदींची त्यांनी सहा आठवडय़ात पूर्तता करावी, अशी सूचना माहिती आयोगाने गेल्या वर्षी तीन जून रोजी केली होती. मात्र, कोणत्याही राजकीय पक्षाने त्यास धूप न घालता आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्षच केले. उच्च न्यायालयात धाव घेऊन कोणत्याही पक्षाने संबंधित तरतुदींना आव्हान दिले नाही किंवा या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेतही विधेयक दाखल करण्यात आले नाही. या पाश्र्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष अग्रवाल, आर.के.जैन व अन्य सेवाभावी संस्थेने माहिती अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. आयोगाने १७ महिन्यांपूर्वी आदेश देऊनही कोणत्याही राजकीय पक्षाने त्या आदेशाकडे दिले नसल्यामुळे सहा राजकीय पक्षांनी सरळसरळ उल्लंघन केले आहे, अशी तक्रार आयोगासमोर या सर्वानी केली.