Ruchika Singh Apology Video Jantar Mantar: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे जमलेल्या काही आंदोलकांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर वाद उद्भवला. कथित रुचिका सिंह नावाच्या मुलीचाही व्हिडीओ समोर आला होता, ज्यात तिने पंतप्रधान मोदींना अश्लील शिवीगाळ केल्याचे दिसत होते. या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तिचा नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तिने आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच तिचे नाव रुचिका सिंह नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री इन्स्टाग्रामवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा पहिल्यांदाच थेट उल्लेख केला. या आंदोलनात माझ्याबद्दल आणि माझ्या आईबद्दल अपशब्द वापरले गेले. तरी माझ्या मनात त्यांच्याबद्दल कटुता नाही. ही खोडकर मुले आहेत. त्यांना सुधारणे आपल्याच हातात आहे, असे विधान त्यांनी या व्हिडीओत बोलताना केले.

मुलीने काय म्हटले?

दरम्यान पंतप्रधान मोदींच्या रात्रीच्या व्हिडीओनंतर या मुलीचा माफीचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ती म्हणाली, “मी माझ्या मित्रांबरोबर कनॉट प्लेसला गेली होती. तिथे आंदोलन करणारे काही लोक पंतप्रधान मोदींना खूप शिवीगाळ करत होते आणि ते इतरांनाही यासाठी उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी ते विधान केले होते. त्याबद्दल मी माफी मागते.”

मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे काही केले ते माफीच्या लायक नाही. मी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल. पुन्हा असे कधीही मी करणार नाही. तसेच हा व्हिडीओ मी पोस्ट केलेला नव्हता. मला इतकी लाज वाटत आहे की, मी स्वतःशीही नजर मिळवू शकत नाही. कृपया मला माफ करा.

FIR मध्ये २५ वर्षांचा उल्लेख

दरम्यान मुलीच्या विरोधात नोएडामधील पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये तिचे वय २५ असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. मुलीच्या विधानांमुळे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिष्ठेचा अपमान झाला असून त्यामुळे अशांतता पसरू शकते, असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

‘त्या मुलांना माफ करूया’ – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी यांनी ३१ जुलै रोजी रात्री आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत जंतर मंतरवर आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणाऱ्या आंदोलकांना माफ करुया, असे म्हटले. या भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा दाखविण्याचे काम आपलेच आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

“समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही भरकटलेली मुले आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणे आपले काम आहे. त्यांना शिक्षा देणे, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणे यातून परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचे आहे”, असे म्हणत मोदींनी आंदोलकांना माफ केल्याचे जाहीर केले.

कंगना रणौत काय म्हणाल्या?

या मुलीच्या माफीनाम्यानंतर खासदार कंगना रणौत यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्या म्हणाल्या, “ती फक्त १५ वर्षांची आहे. ती स्वतः सांगतेय की तिच्या आयुष्यात कधीच तिने पंतप्रधान मोदींविरोधात काहीच पोस्ट केले नाही. पण त्यादिवशी तिच्या मित्रांनी तिला तिथे नेले आणि तिला मोदींना शिव्या देण्यास उद्युक्त केले. आपल्याला आपल्या मुलांना अशा फेमिनाझी आणि डाव्या विचारसरणीच्या राक्षसी लोकांपासून वाचवायला हवे. इतक्या सहज आपल्या मुलींचा त्यांच्या अजेंड्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो, आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना वाचवायला हवे.”