Ruchika Singh CJP PM Modi Slur: ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या नेतृत्वाखाली नीट पेपरफुटीविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुचिका सिंग असे या तरुणीचे नाव असून तिने २३ जुलै रोजी जंतरमंतर येथे तिने वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर

नोएडाच्या एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५३(१) आणि ३५६(१) अंतर्गत ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी आता संसद मार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. “तरुणीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान कार्यालयाच्या प्रतिमेला धक्का लागला असून समाजात असंतोष पसरू शकतो आणि सार्वजनिक शांतता भंग पावू शकते”, असे तक्रारीत म्हटले आहे.

कॉक्रोच जनता पार्टीकडून प्रतिक्रिया

याप्रकरणी सीजेपीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे प्रवक्ते सौरव दास यांनी याप्रकरणी बोलताना, “रुचिका सिंगची भाषा चुकीची असू शकते पण, अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करणे अयोग्य आहे”, असे म्हटले. “आंदोलकांवर अंकुश ठेवण्यासाठी फौजदारी यंत्रणेचा वापर करणे अत्यंत निंदनीय आहे आणि केवळ आक्षेपार्ह भाषेसाठी कोणालाही शिक्षा केली जाऊ नये. मी भाषा योग्य आहे असे म्हणत नाही, ती चुकीची किंवा आक्षेपार्ह असू शकते, परंतु अशा लोकांविराधात फौजदारी यंत्रणा राबविणे योग्य नाही. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण होते. हे कोणालाही, विशेषतः तरुण पिढीला मान्य असणार नाही,” असे दास म्हणाले.

तरुण पिढीला सीजेपीचे आवाहन

तरुण पिढीने अपमानास्पद वक्तव्य करु नये, असे आवाहनही सौरव दास यांनी केले. तसेच, पोलिसांनीही राजकीय हेतूने अधिकारांचा गैरवापर करु नये असेही ते म्हणाले. दुसरीकडे दिल्ली सरकारने आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्यांपैकी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांव्यतिरिक्त इतर कोणावरही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्ट केले.