एक्स्प्रेस वृत्त

मुंबई : अवघे जग सध्या कृत्रिम प्रज्ञा या एकाच विषयाने झपाटलेले आहे. मात्र, भारत याबाबतीत मागे पडला असून त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारताकडे पाठ फिरवत आहेत, असे स्पष्ट मत नामांकित गुंतवणूकदार रुचीर शर्मा यांनी व्यक्त केले. त्याचवेळी सध्या असलेली कृत्रिम प्रज्ञेची लाट निव्वळ फुगवटा ठरण्याची शक्यता असून ती दीर्घकाळ टिकणे कठीण दिसत आहे, असे भाष्यही त्यांनी केले.

रॉकफेलर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि ब्रेकआऊट कॅपिटलचे संस्थापक असलेले रुचीर शर्मा यांच्याबरोबरच्या गप्पांचा ‘एक्स्प्रेस अड्डा’ हा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. द इंडियन एक्स्प्रेसचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शर्मा यांनी ‘एआय’च्या सध्याच्या फुगवट्याची तुलना नव्वदच्या दशकातील ‘डॉट कॉम बबल’शी केली. ते म्हणाले, ‘त्यावेळी ‘अदलाबदली’च्या व्यवसायप्रारूपामुळे भारतीय आयटी कंपन्यांना त्याचा फायदा झाला. मात्र, यावेळी भारत या ‘खेळा’त कुठेच दिसत नाही. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारांकडे पाठ फिरताना दिसत आहेत.’

तंत्रज्ञानविषयक मनुष्यबळ किंवा सेवा पुरवण्याचे भारतीय आयटी कंपन्यांचे प्रारूप दीर्घकाळापासून चालत आले असून नवोन्मेषाची ओढ त्यांच्यात दिसत नाही, असे शर्मा म्हणाले. मात्र, याचाच आपल्याला मोठा फटका बसत असून सध्या आपल्याकडे नवनिर्मितीचीच कमतरता सर्वाधिक दिसत आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूक या देशात येताना दिसत नाही. उलट आर्थिक जगतात भारताकडे ‘कृत्रिम प्रज्ञा विरोधी’ म्हणून पाहिले जात असल्याचे निरीक्षण शर्मा यांनी नोंदवले. आपल्या ३० वर्षांच्या गुंतवणूक कारकीर्दीत भारताप्रति इतकी अनास्था आपण कधीच पाहिली नाही, असे ते म्हणाले. अमेरिका आणि जपान या विकसित राष्ट्रांनी एआयच्या शर्यतीत मोठी मजल मारली असल्याचे सांगतानाच दक्षिण कोरिया आणि तैवान यासारख्या विकसनशील देशांनी साधलेली प्रगती नेत्रदीपक असल्याचेही शर्मा यांनी नमूद केले. मॉर्गन स्टॅन्लेच्या भांडवली निर्देशांकात (एमएससीआय) तैवानच्या टीएसएमसी या कंपनीचे मूल्य भारतातील सर्व कंपन्यांच्या एकत्रित मूल्यापेक्षाही जास्त आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

भारतासमोरील आव्हाने भारतीय बाजारांना सध्या अमेरिकी आयात शुल्क, पश्चिम आशियातील युद्ध आणि एआयतील पीछेहाट यांचा फटका बसत आहे. मात्र, येणाऱ्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग पाहता बाजार चांगली कामगिरी करतील, असा विश्वास रुचीर शर्मा यांनी व्यक्त केला. मात्र, यातील अडथळेही त्यांनी उलगडून दाखवले. दक्षिण कोरिया, तैवानसारखे देश संशोधनावर एकूण जीडीपीच्या चार ते पाच टक्के रक्कम खर्च करत आहेत. अमेरिकेसारखा विकसित देश तीन टक्के खर्च करतो. मात्र, भारतात हे प्रमाण केवळ ०.६ टक्के आहे, असे शर्मा म्हणाले. भारतीय बाजारात लागू असलेला सेक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स अन्य देशांच्या तुलनेत अजूनही जास्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे भारताला परकीय गुंतवणुकीचा ओघ असलेला देश बनवायचे असल्यास काही संरचनात्मक बदल करायलाच हवेत, असे शर्मा म्हणाले.