एका राष्ट्रीय पक्षाचे आज ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून संसदेत स्वागत करावे लागते आहे ही खेदजनकबाब असल्याचे म्हणत काँग्रेसमध्ये गेली ६५ वर्षे गैरकारभार सुरू असल्याचा हल्ला भाजपचे नेते राजीवप्रताप रुडी यांनी केला. पण, निर्णय प्रक्रियेत विरोधकांना सोबत घेऊनच चालू असे वचन देत असल्याचेही रुडी म्हणाले.
संसदेतील आपल्या कृतज्ञतादर्शक भाषणात रुडी म्हणाले की, एका राष्ट्रीय पक्षाचे संसदेत एक प्रादेक्षिक पक्ष म्हणून स्वागत करावे लागेल असा आम्ही कधी विचारही केला नव्हता. असे का घडले? यामागची कारणे काय? तर गेली ६५ वर्षे तुमच्या गैरकारभाराबद्दल जनतेने तुम्हाला यावेळी शिक्षा दिली आहे. तसेच विरोधी पक्षनेता नेमता यावे इतकेही बहुमत काँग्रेसकडे नाही त्यामुळे महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी होता येणार नाही असे रुडी यांनी म्हटल्यावर संसदेत विरोधकांमधून निदर्शनाचा सुर उमटू लागला. चिंता करण्याचे काही कारण नाही आम्ही तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही पंतप्रधान मोठ्या मनाचे आहेत. तुम्हाला सोबत घेऊनच निर्णय घेऊ असा विश्वास देऊ इच्छितो असेही राजीवप्रताप रुडी म्हणाले.