वृत्तसंस्था, बीजिंग (चीन) : चीनमध्ये लष्कराने उठाव केला असून राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे वृत्त ही अफवाच ठरण्याची शक्यता आहे. उझबेकिस्तानहून परतल्यानंतर देशातील करोना निर्बंधांमुळे जिनपिंग एकांतवासात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुढील महिन्यात अधिवेशन होईल, असे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातर्फे सांगण्यात आले.

शनिवारी दिवसभर चीनमधील उठावाची समाजमाध्यमांमध्ये जोरदार चर्चा होती. बीजिंगहून अनेक विमानउड्डाणे अचानक रद्द झाल्याने या अफवेला आणखी हवा दिली. मात्र या चर्चेला कोणताही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. अद्याप याबाबत कुणीही अधिकृत माहिती देत नसले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कोणतेही बंड झालेले नाही. राजधानीजवळ लष्कराचा सराव होणार असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उड्डाणे रद्द केल्याचेही सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पुढल्या महिन्यात होणाऱ्या पंचवार्षिक अधिवेशनासाठी प्रतिनिधींची निवड झाल्याची घोषणा कम्युनिस्ट पक्षाने केली. याच अधिवेशनात जिपिनग यांना विक्रमी तिसऱ्यांदा पक्षाचे नेते आणि पर्यायाने राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडले जाण्याची शक्यता आहे.