पश्चिम बंगालमध्ये भाजपाने २०६ जागा जिंकून इतिहास घडवला आहे आणि मागील १५ वर्षांपासून असलेली ममता बॅनर्जींची सत्ता उलथवून टाकली आहे. या विजयात अनेक उमेदवारांचा महत्त्वाचा वाटा आहे यात काही शंकाच नाही. पण सध्या बंगालमध्ये चर्चा रंगली आहे ती रुपा गांगुलींच्या विजयाची. महाभारत या मालिकेत द्रौपदी साकारणाऱ्या रुपा गांगुली भाजपात आहेत, भाजपाच्या तिकिटावर त्यांनी २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या ३५ हजार मतांनी निवडून आल्या आहेत.

रुपा गांगुली यांना किती मतं मिळाली?

सोनारपूर दक्षिण या मतदारसंघातून रुपा गांगुली यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी तृणमूलच्या नेत्या अरुंधती मैत्रा यांचा ३५ हजार ७८२ मतांनी पराभव केला. रुपा गांगुली यांना या निवडणुकीत १ लाख २८ हजार ९७० मतं मिळाली. तर तृणमूलच्या अरुंधती मैत्रा यांना ९३ हजार १८८ मतं मिळाली. ३५ हजार ७८२ इतक्या मोठ्या फरकाने भाजपाच्या रुपा गांगुली निवडून आल्या आहेत.

रुपा गांगुली महाभारत मालिकेमुळे कायमच चर्चेत

बी. आर. चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या महाभारतात रुपा गांगुली यांनी द्रौपदी हे पात्र साकारलं होतं. या मालिकेमुळे त्या घराघरांमध्ये पोहचल्या. आजही त्यांना महाभारतातील द्रौपदी असंच ओळखलं जातं. महाभारत कथामध्येही त्यांनी द्रौपदी साकारली. चंद्रकांता, गणदेवता, कानून, कस्तुरी अशा विविध मालिकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये अभिनय करुन त्यांनी एक खास ओळख निर्माण केली.

Roopa Ganguly News
रुपा गांगुली यांनी तृणमूलच्या उमेदवार लवली मैत्रा यांचा पराभव केला आहे. (फोटो-सोशल मीडिया)

रुपा गांगुलींनी अरुंधती मैत्रांना कसं हरवलं?

रुपा गांगुली आणि अरुंधती मैत्रा अर्थात लवली मैत्रा या दोघीही अभिनेत्री आहेत. रुपा गांगुलींनी प्रचार करताना बेरोजगारी, सुरक्षा, महिला सुरक्षा, स्थानिक विकास या मुद्द्यांवर जोर दिला होता. तर अरुंधती मैत्रा यांनी सरकारच्या योजनांबाबत सांगत होत्या. या दोघींमधला सामना २४ परगणामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. मतदारांनी रुपा गांगुली यांना कौल दिला आणि अरुंधती मैत्रा यांचा पराभव केला. रुपा गांगुलींचा प्रचार आणि द्रौपदीच्या भूमिकेमुळे इतक्या वर्षांपासून तयार झालेली इमेज याचा फायदा त्यांना मतदानात झाला. त्यामुळेच इतक्या मोठ्या मताधिक्क्याने त्यांनी अरुंधती मैत्रांचा पराभव केला.

Roopa Ganguly News
रुपा गांगुली यांचा सोनारपूरमधून विजय झाला आहे. (फोटो-सोशल मीडिया)

रुपा गांगुलीनी निवडक पण उत्तम चित्रपटांमध्ये केलंय काम

महाभारत ही मालिका १९८८ ते १९९० या कालावधीत टीव्हीवर सुरु होती. या मालिकेतल्या प्रत्येकलाच त्यावेळी आणि त्यानंतरही अमाप प्रसिद्धी मिळाली. रूपा गांगुली या द्रौपदी म्हणूनच ओळखल्या जाऊ लागल्या. रुपा गांगुली यांनी त्यांच्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८५ मध्ये आलेल्या ‘साहेब’ या सिनेमापासून केली. मात्र जेव्हा महाभारत टीव्हीवर आलं तेव्हा त्यांच्याकडे अनेक भूमिका आल्या. तरीही त्यांनी पुढे निवडकच भूमिका केल्या. अपर्णा सेन यांचा ‘युगांत’, गौतम घोष यांचा ‘आबार अरण्ये’, रितुपर्णो घोष यांचा ‘आंतरमहाल’ या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका लक्षात राहिल्या. तसंच त्यांनी टीव्हा मालिकांमध्येही काम केलं. रुपा गांगुली यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ ला झाला. हिंदी आणि बंगाली भाषेतल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. रुपा गांगुली या मॅकेनिकल इंजिनिअर आहेत आणि भाजपाच्या खासदार म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांचं करीअर अभिनेत्री म्हणून यशस्वी ठरलं. मात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या हे देखील वास्तव आहे.

रुपा गांगुलींच्या व्यक्तिगत आयुष्यातही महाभारत

१९९२ मध्ये रूपा गांगुली यांनी ध्रुब मुखर्जींशी लग्न केलं. ते मॅकेनिकल इंजिनिअर होते. ‘सच का सामना’ या कार्यक्रमात रुपा गांगुली जेव्हा आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की ध्रुब यांच्याशी लग्न झाल्यावर मी अभिनय करणं काही काळासाठी सोडलं आणि पतीसह कोलकाता या ठिकाणी राहू लागले. पण तेव्हा आमच्यात खूप मतभेद झाले. ज्यानंतर मी तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला. रोजच्या खर्चासाठी माझे पती मला पैसेही देत नसत असंही त्या म्हणाल्या होत्या. शेवटी २००६ मध्ये त्या ध्रुब यांच्यापासून विभक्त झाल्या.

लिव्ह इन मध्ये राहिल्या होत्या रूपा गांगुली

ध्रुब मुखर्जी यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर दिब्येंदू नावाचा मुलगा रूपा गांगुली यांच्या आयुष्यात आला. १३ वर्षांनी लहान असलेल्या दिब्येंदूच्या प्रेमात रूपा गांगुली पडल्या आणि त्याच्यासह लिव्ह इन मध्ये राहू लागल्या. त्यांच्या या निर्णयाची बरीच मसालेदार चर्चा तेव्हा माध्यमांनी रंगवली होती.

सिगारेट ओढतानच्या फोटोमुळे वाद

रूपा गांगुली यांचा सिगारेट ओढतानाचा एक फोटो काही महाभारत मालिकेच्या नंतर काही वर्षांनी प्रसिद्ध झाला होता. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. मात्र या टीकेकडे रूपा गांगुली यांनी फारसं लक्ष दिलं नाही. त्या नैराश्यातून व्यसनाच्या आहारी गेल्या होत्या असंही त्यावेळी त्यांच्या काही निकटवर्तीयांनी सांगितलं होतं. आता याच रुपा गांगुली भाजपाच्या पश्चिम बंगालमधल्या आमदार झाल्या आहेत.