Rupali Chakankar Ashok Kharat Guwahati Photo: राज्यात खळबळ माजवणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी रोज वेगळे खुलासे समोर येत आहेत. राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचा देखील संबंध जोडला जात आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांवर वारंवार विविध आरोप होत आहेत. अलिकडे रुपाली चाकणकर यांचा खरातबरोबर गुवाहाटी येथील एक समोर आला आहे. या फोटोवर चाकणकरांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या फोटोवरुन काही शंका उपस्थित केल्या आहेत, एवढेच नव्हे तर एसआयटीला याबाबत तपास करण्याची त्यांनी विनंती केली आहे.

अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत

रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातबरोबरचा गुवाहाटीचा फोटो माध्यमांकडे अचानक कुठून आला, का मुद्दाम दिला (पेरला) गेला? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. “चाकणकर परिवारासकट गुवाहाटीला गेल्या होत्या. माध्यमांनी दिलेल्या बातमीत रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात या तीनच नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, फक्त तीन माणसं होती का १२ याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे”, अशी मागणी दमानियांनी केली आहे. याबाबत एक्स या समाज माध्यमावर त्यांनी सविस्तर पोस्ट केली आहे.

दमानियांनी उपस्थित केल्या तीन शंका

२८ ऑगस्ट २०२१ ला खरोखर तीन माणसं गेली होती की १२ माणसं गेली होती ह्याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे. एक महत्वाची बाब म्हणजे, ह्या तारखेनंतर दोन महिन्यात, त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, असे अंजली दमानिया त्यांच्या पोस्टमध्ये म्हणत आहेत. तसेच, ३० जून २०२३ रुपाली चाकणकर पुन्हा गुवाहाटीला गेल्या होत्या. दोन दिवस राहिल्या, आणि २ जुलैला परत आल्या. या तारखेला अजित पवारांनी पक्ष फोडला आणि २ जुलैला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ विधी झाला, असा दावा दमानियांनी केला आहे. तसेच, चाकणकरांचा समोर आलेला फोटो गुवाहाटीचा नव्हे तर रॅडिसन ब्लूचा असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. दमानिया यांनी याची एसआयटी चौकशी करावी अशी विनंती केली आहे.

फोटोबाबत रुपाली चाकणकरांनी काय दिले होते स्पष्टीकरण?

“गुवाहाटीचा जो फोटो तु्म्ही सगळ्यांनी पाहिला आहे तो नीट पाहिला तर कळेल माझ्या कुटुंबासह खरातचं कुटुंबही तिथे आहे. आम्ही खरातसह प्रवास केला नव्हता. अशोक खरात तिथे दर्शनासाठी त्याच्या कुटुंबासह आणि त्याच्या काही लोकांसह पोहचला होता. माझ्या कुटुंबाने यापूर्वी तिथे दर्शन केलं नव्हतं त्यावेळी आमचा भाव असा होता की गुरु बरोबर जर दर्शन करता आलं तर बरं. त्या भावनेतून आम्ही पुण्याहून आमच्या कुटुंबासह गेलो होतो. खरात अनेक लोकांबरोबर त्याच्या कुटुंबाबरोबर तिथे आला होता. दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा अध्यात्मिक भाव मनात होता. खरातला १७ तारखेला अटक केल्यानंतर लक्षात आलं की तो आरोपी आहे. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे अनेक क्षेत्रातले अनेक लोक त्याला गुरु मानत होते, त्याच्या दर्शनासाठी जात होते. त्यामुळे आम्हीही ती भावना ठेवली होती. तो एक श्रद्धेचा भाग होता”, असे स्पष्टीकरण रुपाली चाकणकर यांनी यांनी व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत दिले आहे.