नोटाबंदीबाबत इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘शहरी भागातील जनतेला आणि अभ्यासकांना नोटाबंदीचा निर्णय पटला नाही. मात्र ग्रामीण भागातील जनतेने नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले’, असे मत त्यांनी मांडले.

दिल्लीतील एका विद्यापीठात नारायण मूर्ती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नोटाबंदीच्या प्रश्नावर ते म्हणाले, मी काही अर्थतज्ज्ञ नाही. पण शहरी भागातील अर्थविषयक अभ्यासकांना नोटाबंदीचा निर्णय पटला नाही. याऊलट ग्रामीण भागातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले, असे त्यांनी सांगितले. मी अर्थतज्ज्ञ नसल्याने मला नोटाबंदीच्या निर्णयामागील तर्क काही समजला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला इतकेच समजते की सरकारने पाचशेची नोट बंदी केली. यानंतर तातडीने नवीन नोटा बाजारात आणल्या आणि २ हजारची नोटही आली. आता हे करण्यामागाचे नेमके कारण तुम्हाला तज्ज्ञांकडून समजेल, तुम्ही त्यांच्याशीच याबाबत चर्चा करा, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. भारतातील ७५ टक्के विद्यार्थी हे आठवीतच शाळा सोडतात. त्यामुळे वयाच्या २२ व्या वर्षी ते नोकरीच्या शोधात असतात, असेही त्यांनी सांगितले.