वृत्तसंस्था, कीव्ह, मॉस्को
रशिया आणि युक्रेनदरम्यानचा संघर्ष सोमवारपासून अधिक तीव्र झाला. मंगळवारी पहाटे रशियाने पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. तर युक्रेननेही मॉस्कोवर हल्ला केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला. रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये कीव्हमध्ये किमान एकाचा मृत्यू झाला तर युक्रेनच्या हल्ल्यामध्ये मॉस्कोमधील काही इमारतींचे नुकसान झाले.
रशियाने २४ तासांच्या कालावधीमध्ये युक्रेनची राजधानी कीव्हवर तीन वेळा बाँबहल्ले केले. या हल्ल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. बाँबहल्ल्यात किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर या कालावधीत रशियाने सोडलेले किमान २० ड्रोन युक्रेनच्या सैन्याकडून नष्ट करण्यात आले.
मॉस्कोतील इमारतींचे नुकसान, रशियाचा दावा
दुसरीकडे युक्रेननेही रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये मॉस्कोमधील काही इमारतींचे नुकसान झाले. रशियाच्या सैन्याने युक्रेनचे किमान आठ ड्रोन थांबवल्याचे सांगण्यात आले. मात्र, युक्रेनला अशा प्रकारे हल्ले करण्यात यश येणे ही रशियाच्या संरक्षण खात्याच्या दृष्टीने नामुष्कीची बाब आहे. रशियाने केलेल्या आरोपांनुसार युक्रेनने दुसऱ्यांदा रशियावर ड्रोनहल्ला केला आहे.