अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध भडकलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यात इराण हादरलं असून यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणने अमेरिका आणि इस्रायवर जोरदार प्रतिहल्ले सुरू केले आहेत. या युद्धाच्या झळा आता जगातील अनेक देशांना बसण्यास सुरूवात झाली आहे.

आखाती देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले असून पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची चिन्ह आहेत. असं असतानाच जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने व्यापार ठप्प होण्याची चिन्हे आहेत. यामुळे जगभरातील तेल आणि इंधनाचा साठा विस्कळीत होण्याची शक्यता असून याचा फटका भरतालाही बसण्याची शक्यता आहे.

भारतातील तेल कंपन्यांकडे अगदी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीपर्यंत पुरेल एवढाच पुरवठा असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अशा परिस्थितीत भारतासाठी रशिया मोठी मदत करण्याची शक्यता आहे. रशिया भारताला तब्बल ९.५ दशलक्ष बॅरल तेल पाठवण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने दिलं आहे.

वृत्तानुसार, भारत सध्या समुद्रात तैनात असलेले रशियन तेल टँकर खरेदी करण्याची शक्यता आहे. भारत सध्या हिंद महासागराच्या जवळ असलेले रशियन तेल कार्गो खरेदी करण्याच्या विचारात आहे. आकडेवारीनुसार, अंदाजे ९.५ दशलक्ष बॅरल रशियन कच्चे तेल सध्या टँकरमध्ये भरून युद्धाची परिस्थिती निवाळण्याची वाट पाहत आहे. मात्र, असं असताना जर भारताला पुरवठ्याची कमतरता भासली तर भारत या रशियन तेल टँकरची खरेदी करू शकतो. ज्यामुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी होतील आणि याचा दोन्ही देशाला फायदा होईल असं वृत्तात म्हटलं आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याने व्यापार ठप्प?

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने कब्जा मिळवला असल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने केला. या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जातील असा इशारा इशारा दिला. मात्र, इराणच्या या दाव्याचं अमेरिकेनं खंडन केलं. यूएस सेंट्रल कमांडचे अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणचा दावा खोडून काढला. सर्व इराणी नौदल बुडवले असून १७ इराणी जहाज नष्ट करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला. “अनेक दशकांपासून इराणी राजवटीने आंतरराष्ट्रीय जहाजांना त्रास दिला. आज अरबी आखात, होर्मुझची सामुद्रधुनी किंवा ओमानच्या आखातात एकही इराणी जहाज जात नाही”, असं अमेरिकेने म्हटलं.

‘…तर सागरी व्यापाराला संरक्षण’, डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आवश्यक असल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल टँकरना एस्कॉर्ट करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले की, त्यांनी युनायटेड स्टेट्स डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (डीएफसी) ला सर्व सागरी व्यापाराची, विशेषतः आखातातून येणाऱ्या ऊर्जा वाहतुकीची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राजकीय जोखीम विमा आणि हमी देण्याचे निर्देश दिले आहेत.”