युक्रेनमध्ये घुसखोरी करून युद्ध छेडल्याचा आरोप करत अमेरिकेसह मित्रदेशांनी रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध टाकलेत. याच पार्श्वभूमीवर रशियाने कच्च्या तेलासाठी नवे ग्राहक शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसत आहे. रशियाने भारताला ३५ डॉलर प्रति बॅरल इतक्या स्वस्त दराने कच्चे तेल देऊ केले आहे. याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिल्याचं वृत्त आहे.

रशियाने भारताला उरल्स ग्रेडचे कच्चे तेल (Urals grade oil) देऊ केले आहे. हे कच्चे तेल भारताला सवलतीच्या दरात म्हणजेच ३५ डॉलर प्रति बॅरलने मिळणार आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात याच कच्च्या तेलाचे दर १०० रुपये प्रति बॅरलच्या वर आहेत. त्यामुळे भारतासाठी ही सवलतीच्या दरातील कच्चा तेलाची ऑफर फायदेशीर मानली जात आहे.

रशिया भारताला कच्चा तेलाच्या निर्यातीची सुरुवात म्हणून यंदाच्या वर्षी १५ मिलियन बॅरल कच्चे तेल देऊ इच्छित आहे. याबाबत सरकारच्या पातळीवरही चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश असलेल्या भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. असं असलं तरी अद्यापही भारताच्या आयातीत आखाती देशांसह अमेरिकेचा मोठा वाटा आहे. मात्र, आता रशियाच्या ऑफरने भारताला मोठा फायदा होऊ शकतो. युरोपमधून रशियाच्या कच्चा तेलाच्या खरेदीवर निर्बंध आल्याने सध्या आशियात चीन आणि भारत रशियाचे मोठे ग्राहक म्हणून समोर येत आहेत.

हेही वाचा : “चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया…”; अमेरिकेने भारताला स्पष्टच सांगितलं

विशेष म्हणजे रशियाने कच्चा तेलाच्या आर्थिक व्यवहारासाठी रुपये आणि रुबलचाही पर्याय ठेवला आहे. त्यासाठी रशियाची SPFS ही मेसेजिंग सिस्टम वापरली जाईल. त्यामुळे याचाही भारताला मोठा फायदा होऊ शकतो. असं असलं तरी सध्या या ऑफरवर कोणताही निर्णय झालेला नाही. यावर रशियाचे परराष्ट्र मंत्री २ दिवसीय भारत दौऱ्यावर येतील तेव्हाच चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.